अघोर

मी उभी पाहते वाट
नदीचा घाट
सावल्या हलती
वाऱ्यात उडाला थवा
घुमे पारवा
डहाळीवरती ॥
किरणांचे वाळू घड्याळ
शांत आभाळ
विरागी वाणी
एकली नाव रांगते
जरा पांगते
निळेसे पाणी ॥
हा काळ न जाई पुढे
सारखा अडे
जिवाचा स्पंद
वाळूत हले कवडसा
कुणाचा ठसा
हालतो रुंद ॥
एकेक भाव कोवळा
उरी मोकळा
तुलाच पुकारे
हे क्षणाक्षणांचे डंख
झोंबती लख्ख
तुझेच इशारे ॥
का फिरून देशी हूल
तुझी चाहूल
मिळेना कोठे
की संपत आला खेळ ?
चुकीची वेळ ?
जिवाला वाटे ॥
माध्यान्ह सरावी कशी
जिवाने उशी
कधी रे घ्यावी?
हा सुटून जावा धीर
जाणिव बधीर
तरी ना व्हावी ॥
ये, ये रे आता समोर
मूर्त हे अघोर
मुळी साहेना
बोलावे आणिक काय
जिवाचा पाय
अता राहेना
अता राहेना......

-संपदा
(५ नोव्हेंबर २००७)