या मातीतच विरून जावे॥

पायाखाली काळी माती
त्यात रुजावी जीवनपाती ।
उमलुन यावे हिरवे जगणे
हिरवी बोटे हिरवी छाती॥

तापुन जावे, कधी निवावे
ऋतूऋतूचे गाणे गावे ।
थेंबाथेंबातून पुन्हा त्या
कुशीत काळ्या मिसळुन जावे॥

कळीकळीची होउन स्वप्ने
विणू जिवाचे ताने बाने ।
होउन गळता पिकली पाने
चिरंतनाची द्यावी वाणे॥

रंग लेउनी लाख सजावे
धवल शेवटी प्रकाश व्हावे ।
जळासारखे पुन्हा पुन्हा मी
या मातीतच विरून जावे॥

-संपदा
(१५.११.२००७)