सारे काही तेच आहे...

सारे काही तेच आहे... जुना श्वास... जुना ध्यास
पुनः पुन्हा घाली साद... तुझा गंध अन सहवास !

सारे काही तेच आहे... तोच कदंब... तेच वळण
छाया तीच... माया तीच... तीच राधा, तोच मोहन!

सारे काही तेच आहे... तोच पावा... तोच धावा
आणाभाका-शपथा त्याच... प्रेमाचाही तोच दावा !

सारे काही तेच आहे... जुने नभ... जुने ढग
उजळता दीप आठवांचे... मात्र जाणवते थोडी धग !

सारे काही तेच तरी... जाणवतेच... तुटली नाळ
खेळ सारा उमगता... सरलेच सारे मायाजाळ !