रास-झूला

कशा सांगू गोष्टी सये
काल रातीच्या गं तुला
मला अजून आठवे
कदंबाचा रास झूला

होती शरद पुनव
चांदण्यात न्हाली रात
जेव्हा कान्हाने घेतला
अलगद हाती हात

हळू विलगले ओठ
प्याला मुखी गं मुखाचा
आहे अजुनही ताजा
डंख स्वर्गीच्या सुखाचा

असा हळूवार झाला
हाती घेतांना उरोज
माझा जीव संकोचला
जसे मिटावे सरोज

अंगा भिडले गं अंग
अंतराय ना उरला
जसा भ्रमर कमळी
कान्हा माझ्यात शिरला

त्याचा हळुवारपणा
जाणे कुठे बाई गेला
त्याचा वादळी आवेग
झूला आभाळी गं नेला

स्वर्गसुखाच्या त्या लाटा
अशा आल्या अशा आल्या
माझ्या साऱ्या चित्तवृत्ती
रतिसुखाने भिजल्या

सारी रात हाच खेळ
अंग अंग ठणकारते
त्याच्या आठवाने बाई
देहवीणा झणकारते

असा कान्हा असा रास
अन् कालिंदीचा काठ
पुन्हा कधी माझी पाळी
वेडी बघते गं वाट!