अजुनि काही तास रेटले
राखीत शीर्ण स्मृतींचे कलेवर
अजुनि काही तास रेटविन
दाबुन कंठामधला गहिवर॥
जीर्ण व्यथा ही जाणीव तुडवे
वजन भयंकर आकाशाचे
पाण्यामधुनि तळपत फिरते
धूड अबलख या माशाचे॥
फुटक्या कंठामधल्या या टाहोला
पिचकी पेटी करते साथ
फुटक्या डग्ग्यावरच्या या थापेला
हवाच असला बोजड हात॥
अस्ताईवर परतुनि फिरलो
उपसुनि काळजातिल अंतरा
झळकता प्रकाश उरी साठवून
पक्षी जाय दिगंतरा