अंधारयात्रा

अंधाराला भिऊ नकोस, जागच्या जागी थांबू नकोस
कोण म्हणतं, जागच्या जागी सुरक्षित असतं
तसं काहीच गृहीत नसतं..
एखाद्यावेळी जमीन धसेल आत खोल पाय फसेल
म्हणून तू चालत रहा..
अंधाराला भिऊ नकोस, जागच्या जागी थांबू नकोस

काडेपेटी असेल जवळ तर एक काडी ओढ
एका पावलापुरती तरी अंधाराची मिठी सोड
पुढची पावलं आपोआप पडतील अंधाराच्या गाठी सुटतील
म्हणून तू चालत रहा..
अंधाराला भिऊ नकोस, जागच्या जागी थांबू नकोस

जवळच कुठे पणती दिसेल, बघ तिच्यात तेल असेल
तू फक्त वात लाव, प्रकाशाला मिळेल वाव
अंधारमिठी होईल सैल, तुझीही मग भिती जाइल
तरीही तू चालत रहा..
अंधाराला भिऊ नकोस, जागच्या जागी थांबू नकोस

आता तुझ्या मागे लोंढा असेल, त्याच्या हातात मशाल असेल
पणतीवर ते मशाल धरतील उरलेल्या अंधाराला दूर पळवतील
अंधारावर होईल मात उजेडाचे दिसतील दात
पण तरीही तू चालत रहा..
अंधार आता सरला तरी यात्रा तुझी संपायचीय
तुझ्या स्वप्नामधली तुला वाट अजून सापडायचीय
२ मार्च २००७
सिंगापूर