खर्डेघाशी

दिवसांवर दिवसांच्या राशी
जीवन म्हणजे खर्डेघाशी

फोडासम ज़पलेले शैशव
खपली धरते तळहाताशी

तुझ्या बटांशी खेळुन जावे,
वार्‍याची इतकी बदमाशी?

बांधू जेथे घरटे आपण
तिथेच मथुरा,तिथेच काशी

भुकेल्यांस भाकरी नसे, अन्
खाणारे खाऊन उपाशी

तुझ्याविना जगण्याची शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?

जरी वादळे येती ज़ाती
लाटांना भिडतात खलाशी