आठवणींची पाने

आठवणींची पाने 

वळून  बघता माघारी मेळ जमे आयुष्याचा
आनंदाचे कण इवले, गाळ राहतो दु:खाचा 
म्हणून म्हणतो  सखे नेहमी, एक पथ्य  हे पाळ
आठवणींची ओली पाने,  सखये  जपून  चाळ.....॥१॥

    शपथ मोडली म्हणून येथे कोणी  अबोल बनले
काही डोळे  उंबरठ्यावर वाट पाहुनी थकले
  नकळत  कोठे गालांवरती  थोडे पाणी झरले.  
माळुन घेउन  त्या मोत्यांना  तूच सखे सांभाळ .. . ॥२॥

काटे  लागुन  हाताला  जर कोणी उदास बसले
वसंत असुनी   बाग  कुणाचे कधीच नाही फुलले 
दखल तयांची घेई ऐसे  जवळ  कुणी  ना दिसले
त्या साऱ्यांना  आपुलकीने,  सखे जरा  कवटाळ..  ॥३॥

पडून गेल्या उल्का आणिक माती उरली मागे
उडून गेले छप्पर , करुनी निजल्या घरास जागे
शीड कधीचे तुटून गेले, उरले नुसते धागे
क्षणाक्षणाचा हिशोब ठरतो, फक्त एक जंजाळ  ..॥४॥

सोनाली जोशी