न जमलेलं कवित्व ..

मला वाटले सहज एकदा

करून पाहावी, एक कविता

फार सुरेख नाही, निदान

अर्थ लागावा यमक जुळता ॥१॥

        

एका निर्जन शांत स्थळी

मी कवी साधना सुरू केली

असूनी मराठी मायबोली

विषय सुचेना ऐनवेळी ॥२॥

         

दोनेक तास असेच गेले..

मनात अनेक आशय आले

शेवटी प्रेमकाव्य लिहिण्याचे

मी 'अघोरे' धाडस केले  ॥३॥

        

माझ्यासारख्या गद्य व्यक्तीने

चक्क प्रेमकाव्य लिहिणे

हे म्हणजे संन्याशाने

अप्सरेच्या प्रेमात पडणे ॥४॥

       

विषय मिळाला प्रेमाचा

अन चुकला ठोका काळजाचा

आमच्या शब्दकोशामध्ये

अभाव मुळी त्या शब्दाचा ॥५॥

        

मग सुरू जाहली शब्दजोड

वाक्य जमेना, कडवं सोड..

अथक परिश्रमानंतर..

उरली फक्त खाडाखोड ॥६॥

     

माझी कविता म्हणजे

शब्दांचा नुसताच सापळा होता..

त्यात प्रेमळ भावनांचा

फार मोठा अभाव होता ॥७॥

       

कवी होण्याची माझी सारी

इच्छा इथेच विरूनी गेली

त्यानंतर कविताच काय

'चारोळी' सुधा नाही केली ॥८॥

     

जरी कवी न बनणे जमले

सारे प्रयास वाया गेले

श्रोता बनुनी आनंदाने

कवितेस मी अनुभवले ॥९॥

                                  - श्रीयुत पंत