ह्यासोबत
संतोष शिंत्रे यांची 'साप्ताहिक सकाळ' दिवाळी २००७ अंकात प्रसिद्ध झालेली ही कथा इथे देत आहे. ही कथा इथे चिकटवण्यासाठी मदत केल्याबद्दल चित्त यांचे विशेष आभार
--------------------------------------------------------------------------
एकंदरीतच त्या दिवशी ग्राफिक डिझायनर राजू देशपांडे प्रचंड कंटाळला होता. सरळ स्टुडिओ बंद करुन गावाबाहेर एक निर्हेतुक, शून्यमनस्क चक्कर मारण्याच्या विचारात तो होता. दिवसभरात एकहीचमकदार, लक्षात रहावी अशी घटना घडली नव्हती. त्यामुळे आलेला कंटाळा.
असं खरं फार वेळा व्हायचं नाही. रंग, रेषा, छायाचित्रण, अक्षरकला, कागदांचे वेगवेगळे प्रकार, संगणक या सगळ्यातून उमलत जाणारं त्याचं काम, त्याला ताजंतवानं ठेवायचं. पण अशी काही निर्मिती पण त्यानं त्या दिवशी केली नव्हती.पण कुठला विचार पक्का होण्याच्या आतच, त्याला स्टुडिओत कुणी आल्याची जाणीव झाली.
कसलीशी गुंडाळी प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन दारात एक लहान चणीचे प्रौढ गृहस्थ उभे दिसले. तद्दन पारंपारिक जाडजूड वहाणा, चष्मा, साधीशी पँट-शर्ट.
"राजू देशपांडे - झेन आर्ट स्टुडिओ?" काहीशा संकोचानंच त्या गृहस्थांनी विचारलं.
राजूनं उठून हात मिळवला."मीच. बसा. काय काम काढलं?"
"हे... हा एक नकाशा आहे... जुना. म्हणजे खरंतर ऐतिहासिक, दुर्मिळ प्रकारातला आहे. स्कॅनर असेल ना आपल्या इथे?"
"आहे ना. काय नाव साहेब आपलं?" राजूनं त्यांनी दिलेली गुंडाळी उलगडली.
"अरे हो.. मी साताळकर. सातारकर नाही हं.. सा-ता-ळ-क-र. सोळाव्या आणि सतराव्या शतकातल्या डच आणि फ्रेंच वसाहती आणि आपले मराठेशाहीचे त्यांच्याबरोबर संबंध, अशा विषयावर मी काही अभ्यास, संशोधन केलं आहे. त्याच संदर्भातला हा एक अस्सल नकाशा आहे. भारतातल्या फ्रेंच कॉलनीज् आणि तिथली तत्कालिन स्थानं निश्चिती करणारा."
पुन्हा एकदा त्यांनी तो राजूकडून घेऊन बघितला. "मूळ तर मला परत द्यावा लागणार आहे. पण स्कॅन करून एक प्रिंट.. आणि जर तुमच्या या यंत्रात त्याची एखादी प्रत 'ई-जपून' ठेवता आली तर..."
राजूनं मान हलवली. "एखादा दिवस ठेवता येईल का सर? म्हणजे आमच्या त्या राईट पिक्सेल साईजला वगैरे करून मी तुम्हांला प्रिंट देईन, आणि कोरल मधे घेऊन एक सीडी पण."
"किती पैसे होतील, या सगळ्याचे ? उद्या चार पर्यंत होईल ना? तुम्हाला मी काही रक्कम आगाऊ देऊन ठेवू का? आणि तुम्ही हा नकाशा व्यवस्थित जपाल, ना?" त्यांचे तेच काही क्षण थबकले. " मी फार प्रश्न एका दमात विचारले का? अर्थात हाही प्रश्नच झाला
म्हणा."
राजूला हसायला आलं. "ठीक आहे, सर, ऍडव्हान्स वगैरेची गरज नाही. आणि मॅपची 'वर्थ' मला कळलीय् - काही काळजी करू नका. चार वाजता नक्की तयार ठेवतो."
अशी जरा वेगळी, चॅलेंजिंग आणि ज्ञानाबिनात भर टाकणारी कामं आली, की राजूला आपल्या धंद्याबद्दल जरा प्रेमच दाटून यायचं. मनासारखी पेंटिंग्ज करायला वेळ होत नाही, या बद्दलची त्याची खंत कमी व्हायची, हे एक असलं काम होतं. स्कॅनिंगच्या मिळणा-या अडीचशे-तीनशे रुपयांहून खूप पटीनं मूल्यवान.
दुस-या दिवशी सा-ता-ळ-क-र बरोबर चारला उगवतील, हा त्याचा अंदाज खरा ठरला. सकाळीच त्यानं त्यांचं बरंचसं काम पूर्ण केलं होतं.
"बसा सर...." राजूनं आणखी एक खुर्ची संगणकाजवळ ओढली. त्यावर पडलेला, कुठल्याशा बँकफोर्जर नटवरलालची कव्हर स्टोरी असलेला इंडिया टुडेचा अंक, त्यानं बाजूच्या टेबलवर टाकला आणि'साताळकर' नाव दिलेला फोल्डर संगणकात उघडला.
"व्वा. बरंचसं झालंच आहे की. छान होतंय". साताळकर. "हो सर.. पण मला एक दहा मिनिटं द्या. सगळ्या फॉरमॅट्ससाठी कंपॅटिबल फाईल्स करून तुम्हाला सीडी देतो."
आणि तो एकाग्रपणं कामाला लागला. साताळकरांनी बाजूला पडलेला 'इंडिया टुडे'वाचायला घेतल्याचं त्यानं पाहिलं.
काम पूर्ण होताहोताच साताळकरांच्या आवाजानं त्याची तंद्री मोडली.
"हे वाचलं का तुम्ही, या बँकांना गंडवणा-या चोराचं... कोण हा नटवरलाल?" साताळकर विचारत होते.
"साधारण चाळलं. काय त्याचं?" सीडी ड्राईव्हमध्ये घालतांना राजूनं विचारलं.
"अहो.. ह्याची फसवणुकीची सगळी तंत्रं... सगळीच जवळपास, आम्ही लोक आमच्या संशोधनात अस्सल नक्कल कागदपत्रं, दस्तावेज ओळखायला वापरतो. डिमांड ड्राफ्टवरची चिकटपट्टी हा बायकांच्या हेअरड्रायरनं सोडवतो. जुने पुराणे दस्तऐवज आम्हीही असेच सोडवतो. फोर्जड डिमांड ड्राफ्ट करण्यासाठी कागद अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात बघून शाई कुठे किती मुरली आहे, हे तंत्र तर कित्येक शिक्के, कागद यांच्या अस्सलपणासाठी आम्ही वापरतो. कागद खरवडून मूळ रक्कम खोडली, की खरवडलेला कागद कळू नये, म्हणून विशिष्ट खळीचा वापर... कमाल आहे. आम्ही सगळी, सगळी तंत्रं- अशीच, फक्त भल्या उद्देशानं कागदपत्रांच्या पडताळणीत चिकार वापरतो. महाठक आहे हो, हा माणूस. कोटींत कमावले त्यानं हे सगळं वापरून आणि साताळकर हिंडतायत् जुन्या लँब्रेटावरून. असो. तर काय झालं आपल्या त्या नकाशाचं? झालाय का?"
तोवर राजू देशपांडेनं एक सीडी आणि एक प्रिंटही काढली होती. ती त्यानं साताळकरांकडे दिली.
"उत्तम ... मला काही बघायला लागलं नाही. किती पैसे देऊ याचे?" साताळकर समाधानी दिसले.
" काय... दोनशे रुपये द्या, सर. आपली ओळख झाली, ह्याचा मला आनंद जास्त आहे."
"हे घ्या..." साताळकरांच्या चेह-यावर मिस्किल भाव आला. "आणखी वृध्दिंगत करायची असेल -ओळख, तर मी चार गल्ल्या पलीकडेच राहतो. आज वाहन आणलं नाही. मला सोडाल का घरापर्यन्त? चहाबिहा पिऊ. सौभाग्यवतींचीही ओळख होईल."
राजूनं मूळ नकाशा कुलपातून बाहेर काढतांनाच होकारार्थी मान हलवली.
घरी परतेपर्यंत त्याच्या डोक्यात साताळकरच होते. त्यांनी केलेलं ते बँक फोर्जर- इतिहास संशोधक हे विश्लेषण त्याला घट्ट मनात बसलं होतंच. पण त्याहूनही जास्त, त्यांच्या घरातील बाहेरची, बैठकीची खोली आणि साताळकरांची उमटलेली खंत, जणू अधोरेखित करणारी त्यांच्या टेबलवरची, राजूला खटकलेली एक गोष्ट.
अडीच तीन खोल्यांच्या त्यांच्या संसारात, बाहेरच्या खोलीत ब्राऊनपेपरची कव्हर्स घातलेली कैक पुस्तकं अपेक्षितच होती. चारातल्या दोन भिंती व्यापलेली. त्यांच्या मेजावर (टेबलावर नव्हे!) साग्रसंगीत दोन मस्त बोरु, शाईची दौत असा जामानिमा होता, तोही राजूला अपेक्षितच होता. त्याला एक सवय होती. प्रत्येक माणसाच्या बैठकीच्या खोलीत एक वस्तू अशी असते, जी बहुतेक दुसरीकडे कुठे न दिसणारी असते. राजू कुणाहीकडे गेला, तरी ती कळीची गोष्ट पहात, शोधत असायचा. त्यातून कदाचित काही वेळात्या माणसाचाही जरा अंदाज घेता यायचा. या 'बोरू-दौत' कॉम्बिनेशनला त्यानं त्या 'एकमेवाद्वितीय'
वस्तूचा मान देऊनही टाकला होता.
पण यात खटकण्याजोगं काही नव्हतं. तो थोडासा आश्चर्यात पडला होता, ते त्या दौतीखालचीएक गोष्ट पाहून. 'प्लेविन सुपर लोटो' आणि 'महाराष्ट्र राज्य लॉटरी' अशी प्रत्येकी दोन-दोन तिकीटं त्या दौतीखाली फडफडत होती, त्याचं त्याला आश्चर्य आणि वाईटही वाटलं होतं. कारण, झालेल्या बोलण्यातूनच साताळकरांची जी विद्वत्ता प्रकटत होती, त्याला ती तिकीटं छेद देत होती.
चहाबरोबर झालेल्या गप्पामंध्ये, साताळकरांनी राजूच्या ज्ञानात बरीच भर टाकली होती.
स्टुडिओतल्या त्यांच्या बोलण्याचा धागाच त्यांनी पुढं नेला होता. रंग, रेषा, भाषा, कागदाचे प्रकार या सगळ्याशी राजूची असलेली जवळीक ओळखून की काय, पण बनावट ऐतिहासिक पत्रं, कागद लोक कसेकसे बनवू शकतात, मग ते ओळखतांना संशोधकाला काय काय कसरती कराव्या लागतात हे सगळं सांगितलं होतं. अशा कागदपत्रांचं वस्तुनिष्ठ परीक्षण काय काय तंत्रं वापरून करतात, यावर त्यांनीच लिहीलेल्या इंग्लिश शोधनिबंधाची प्रतही त्यांनी उत्साहानं राजूला वाचायला दिली होती.. बळंच. संशोधनात बुडवून घेतल्यामुळं पैसे मिळवता आले नाहीत, ओढग्रस्त कायम राहिली ही खंतही मधून मधून बोलण्यात डोकावत होतीच. फ्रान्समधे किंवा युरोपात असा बनावटपणा, निदान चित्रांचा -
ओळखण्यासाठी प्रचंड मानधन मिळतं हे राजूकडून ऐकल्यावर तर त्यांनी निव्वळ कडवटपणं मान नकारार्थी हलवली होती.
बाईकवरुन परत येतांना राजू त्यांच्याबद्दलच विचार करत होता. असे एकांडे संशोधक, कलावंत यांची आपल्या समाजात होणारी उपेक्षा त्यानं इतर काही लोकांचीही पाहिली होती. काही लोक त्यातले अस्सल कलंदर बेअरिंगमधे असल्यामुळे त्यांना अशा गोष्टींची खंतच वाटत नाही, असेही त्यातले काही पण फार कमी, राजूच्या मनात आलं. बहुतांश लोक असेच कुढत राहून, कडवट बनत गेलेले. पण समाजाचा अस्सल, नॉनइंटरनेटी ज्ञानसंचय जपून ठेवलेले. सगळ्या जीवनसंघर्षात सुध्दा. साताळकर एरवी कितीही चिकित्सक, विश्लेषक असले, तर्कशास्त्राळ्य विचार करणारे असले तरी 'लॉटरी लागणे' हा
मोह टाळू शकत नव्हते, ते त्यांच्यातल्या या मानवी वैतागामुळंच असणार. त्यात नेमका त्यांना ती बँकफोर्जरची कव्हरस्टोरी वाचायला मिळाली. म्हणजे आध्यात्मिकरीत्या भयंकर उन्नत झाले असणार ते, राजूला वाटून गेलं.
पण स्टुडिओत पोहोचल्यावर एका अभियांत्रिकी उद्योगसमूहाची ऑटोकॅडमधली ड्रॉइंग्ज - प्रोसेसिंगसाठी त्याची वाट पहात होती. त्यामुळं साताळकरांच्या शोधनिबंधाची प्रत बाजूच्या कपाटात फेकून, ग्राफिकडिझायनर राजू देशपांडे कामाला लागला होता. साताळकरांना मेंदूच्या द्वितीय श्रेणी स्मरणशक्तीच्या अगम्य कुठल्याश्या कप्प्यात टाकून. रोजच्या जगण्याचं उर्ध्वपातन होऊन, एक चांगली ओळख दिवसाभरातझाल्याचं समाधान मात्र त्याला निश्चितच होतं.
(क्रमशः)