ह्यासोबत
"एखादा कागद बनावट तयारच केला जातो, तेव्हा त्यामागे काही निश्चित हेतू असतो. मोटिव्ह. आमच्या या डिटेक्टिव्हगिरीच्या सुपारीत, सदर कागद पत्राचे विद्यमान मालक चिटणीस कुटुंबिय, हे हेतूपुरस्सर असं काही करतील असं वाटत नाही" साताळकर बरोबर तिसऱ्या दिवशी येऊन कामाचा आढावा राजूपुढे मांडत होते.
"कुठल्यातरी जमिनीवर, मालमत्तेवर हक्क प्रस्थापित करणं. एखादं मत, किंवा विचारसरणीच्या समर्थनार्थ किंवा विरोधासाठी असे कागद तयार करणं. हे असे मोटिव्ह्ज असू शकतात. त्यातले कुठलेच मुळात या दस्तावेजाला मुळी लागूच नाहीत. 'दुर्मिळ' म्हणून विकून पैसे मिळवणे हा हेतू असू शकतो... पण ती खरे-खोटेपणाची पारख आपण करतो आहोतच. चिटणीस फॅमिली तशी वेल्-टू-डू आहे. बनावट कागदपत्रं बनवायला लागणारे प्रचंड कष्ट ते उपसतील ही शक्यता कमीच आहे."
राजूनं खुणेनंच स्टुडिओतल्या मुलाला चहा आणून ठेवण्याची खूण केली. साताळकरांनी एकदात्याच्याकडे पाहिलं, आणि त्याच संथ आवाजात पुन्हा सुरुवात केली.
"आणखी एका महत्वाच्या गोष्टीची मी खात्री, गेल्या दोन दिवसात केली. ते म्हणजे सदर कागदातल्या मजकुराची भाषेच्या अंगानं खात्री करुन घेतली. बनावट कागद करणा-यांचा तत्कालिन भाषेचा अभ्यास नसल्यामुळे त्यांना त्यातले बारकावे, खाचाखोचा फार माहिती नसतात. घाईत काहीतरी लिहून जातात... आणि एखाद्या साध्या भाषेच्या बारकाव्यात एक्स्पोझ होतात. ह्या राजारामाच्याच एका बनावट पत्रात मागं,"तरी नीट चालीने वागणे, म्हणजे पुढे सर्वतोपरी उर्जिताचे कारण जाणिजे" हे शंकास्पद वाक्य होतं. त्याच्या इतर पत्रातल्या मराठीमधे, "तुम्ही त्यांचे आज्ञेप्रमाणे वर्तणूक करीत जाणे. पुढे स्वामी त्या प्रांती येतील, तेव्हा तुमचे उर्जित करतील". अशा प्रकारची रचना बहुतांश ठिकाणी आहे. 'उर्जिताचे कारण जाणिजे' हा फारसी भाषेचा लहेजा. मराठीसाठी ही अत्यंत विचित्र वाक्यरचना झाली - फारसी पत्रांमधे अशी रचना आहे, असते, ती मराठीत आणून या 'बनावटकारा'नं खपवण्याचा प्रयत्न केला, पणइतर कसोटय़ांवर तो टिकला नाही."
"लिपी, विशिष्ट वाक्यप्रयोग, व्याकरण यांही निकषांवर मी सदर कागद पडताळून पाहिला. आज रोजीतरी संशयाला कोणतीही जागा नाही."
राजू चांगलाच प्रभावित झाला होता. तो कसाबसा बोलला.
" सर... हे जबरदस्त लॉजिक आहे. कामाचा भाग म्हणून नाही, पण मला रस आहे म्हणून... हे लिपी वगैरे तुम्ही म्हणालात, त्याची उदाहरणं सांगा ना - म्हणजे, मला जास्त कळण्यासाठी."
साताळकरांनी जागेवरच, घातलेली मांडी बदलली.
"ह्यातच पहा ना... किती पैसे, कसे, फ्रेंचांनी द्यावेत, याचा उल्लेख जिथे आहे, तिथे मी बारकाईनं पहात होतो. त्याकाळी '५' हा आकडा मराठीत खूप वेगळ्या पद्धतीनं लिहीला जायचा. सध्या आपणलिहीतो, तो '५' अठराव्या शतकाच्या सुरुवातीला आला. किंवा 'ऍ', 'ऑ' या उच्चारांचे शब्द मराठीत त्या वेळी नव्हतेच. अर्धचंद्र मराठीत काढला जायला लागला, तोच १८५० साली. साहजिक, त्यातला तसा काही शब्द आला असता, तर आपसूक कागदाचा खोटेपणा सिद्ध झाला असता."
आता साताळकर येरझा-या घालत होते.
"तारखाही जुळतायत. समकालीन अन्य इतिहासाच्या साधनांमधे, झेरमँ हे पत्र घेऊन आला त्याची तारीख - पाँडेचेरीला पोहोचल्याची - ३ जुलै, १६९० अशी आहे. आणि करारापोटी फ्रेंचांनी द्यायचे पैसे जूनच्या दुस-या आठवडय़ात जिंजीला पाठवले गेले. ही पण नोंद पत्राच्या तारखेला पूरक अशीच आहे. चंदी/ जिंजीला कागद म्हणूनही काही पत्रं मिळतात. पण ती प्रमाण धरली जात नाहीत."
"तर राजाधिराज देशपांडे, आज इतकं ज्ञानवर्धन पुरे झालं, नाही का ? हा आजच्या तारखेचा माझा रिपोर्ट. आत्ता आपण बोललो, त्या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. आता भेट आणखी तीन दिवसांनी, निघू मी ?"
तीन दिवस बाकी कामात राजू पार बुडून गेला होता. पण साताळकर, त्यांचं विश्लेषण हे मनात कुठेतरी पार्श्वभूमीवर झंकारत राहिलं होतं.
एकदा त्यानं चारुला फोन केला. पण फार सविस्तर बोलणं झालंच नाही. तोही मुंबईत कामाच्या कुठल्याशा मीटिंगमध्ये होता. चिटणीस कुटुंबियांना त्यानं हे विश्लेषणाचं काम साताळकर पुण्यात करतायत्,इतकं सांगितलं होतं. पण चिटणीस फॅमिलीला ते कोण, हेच माहिती नसल्यानं फारसा फरक पडला नाही.
राजूनंही फक्त काम व्यवस्थित चालू आहे, हा फील पेडणेकरपर्यंत पोचवून फोन ठेवून दिला.
पुढचं साताळकर - सेशन झालं, ते राजूला वाटलं होतं त्याही पेक्षा जास्त रंजक आणि अर्थातच ज्ञानवर्धक झालं. कदाचित डिझायनिंगच्या कामात राजूला वेगवेगळ्या जाडीचे प्रकारचे, गरजेचे कागद हाताळायला लागत, त्याहीमुळे असेल कदाचित, पण सगळी चर्चा राजूला एकदम पटून गेली.
"ह्या बनावटगिरीची, खातरजमा करण्याचा एक मोठा शत्रू.... आणि एक मोठा मित्र महितीये का तुम्हाला, देशपांडे? ... कागद. ते डॉक्युमेंट ज्यावर बनवलं गेलं आहे, तो कागद. आता तो मित्र ठरु शकतो, कारण काही वेळा तो कागदपत्राचा खोटेपणा काही सेकंदात उजेडात आणू शकतो. उजेडात, म्हणजे अक्षरशः उजेडात-वाईट होता हो, माझा हा विनोद. इकडे या, खिडकीपाशी."
सूर्यप्रकाश थेट येणाऱ्या एका खिडकीपाशी त्यांनी राजूला बोलावलं. "हा एक बनावट ठरलेलाकागद, मी मुद्दाम तुम्हाला दाखवायला आणला आहे. हे पहा, मागच्या बाजूनं साधा सूर्यप्रकाश जरी त्याच्यावर पडला, तरी अनेक गोष्टी कळतात. आपण पहातोय, तो नकली कागद, दुस-या कागदाची जोड लावून बनवलेला कळतोय. वरचा भाग अस्सल आहे. पण खालचा जोड लावलेला आहे. नुसतं तेवढंच नाही, तर पागोळ्यांच्या पाण्याखाली तो आधी धरून, नंतर मंद आगीच्या आचेवर तो शेकला आहे."
राजूला काही फारसा बोध झाला नाही. "कशासाठी, पण सर...?"
"जुना वाटावा म्हणून. बाकी काही नाही. काहीवेळा तर लोक भयंकर कष्ट करतात. तत्कालीन, लोक ज्याला 'कागदकुटय़ा' म्हणायचे - कागद तयार करणारा, जी खळ वापरत असे, ती तंतोतंत तशीच करून, कागदावरच्या काही ओळी झाकण्यासाठी किंवा नवीन काही ओळी घुसडण्यासाठी ही खळ कागदाला लावली जाते. पण उजेडात तेही दिसतं."
राजूला हळूहळू का होईना, कळत होतं. "बरोबर सर. पागोळ्यांचं मातकट पाणी, आणि मंद आगीनं आलेलं बर्नट् टेक्स्चर. कागद जुना वाटणारच. काही म्हणा सर... बनावट पेपर्स तयार करणं, हे जरा जास्तच कष्टाचं काम आहे."
साताळकर दाद दिल्यासारखे हसले. "पण देशपांडे महाराज, कैक हेक्टर जमिनीची
मालकी वगैरे जर तुम्हाला मिळणार असली, तर त्या लोभानं करणार की नाही तुम्ही इतके कष्ट? आणि आपण जितकं काटेकोर परीक्षण करतोय, तितकं प्रत्येक कागदाचं होईल असं नाही."
राजूला पटलं, "हो, तेही आहेच. तर थोडक्यात म्हणजे अशी कागदपत्रं करणारे, वेगवेगळ्या वेळी ती करतच रहाणार."
"बरोबर ! करतच रहाणार. आपल्यासाठी रामदास. "चित्ती अखंड असो द्यावे, सावधपण!.... किंवा जी काय ओळ आहे ती. स्मरण कमी होतंय हो, वयपरत्वे" तो बनावट कागद पिशवीत ठेवून, सरांनी राजारामाचं चालू विश्लेषणातलं पत्र परत हातात घेतलं.
"हे पहा, राजूमहाराज. मराठे वापरत असत तो कागद जुन्नरच्या आसपास बनलेला - एका विशिष्ट पोताचा, जाड आणि खरबरीत असतो. तसा हा आहे. गोव्याकडेही, त्या काळात कागद बनायचा. सगळी युरोपीय मंडळी बहुधा तो वापरायची. मागे मी एक मावळातलं बनावट पत्र... वतनाचं, उघडकीला आणलं होतं, त्यावर चक्क अशा गोवा-मेड कागदाचा वॉटरमार्कच होता. मराठय़ांच्या कागदपत्रांमधे कुठला आला वॉटरमार्क? पडला उघडा खोटेपणा."
राजूनं विचारलं, "सर... म्हणजे या निकषांवर आपलं पत्र - करारपत्र अस्सल ठरतंय असं म्हणायचं का?"
"अजून नाही. त्याचा कागद तेवढा अस्सल मराठेकालीन, राजारामाच्या वेळचा आहे, हे नक्की...गोंधळलात ! अहो, बऱ्याच वेळी पळापळ, युद्ध या धामधुमीत अस्सल शिक्के मारलेले कोरे कागद तयार करून ठेवले जायचे, घेऊन गेले जायचे मुक्कामी. असा एखादा कागदही कुणाच्या हातात पडू शकतो.पेशवे दप्तरात अजूनही असे अस्सल, कोरे कागद मधूनमधून सापडतात. तसा कागदही बनावट दस्तऐवजतयार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.. त्यामुळे पत्राच्या अस्सलतेचं अनुमान नाही निघत."
राजूला प्रकाश पडला. त्या अंगानंच बहुतेक साताळकर कागदाला शत्रू म्हणाले असणार.
"पण मग आपला निष्कर्ष काय.. म्हणायचा ?" त्यानं विचारलं.
"राजू महाशय... आज रोजी निष्कर्ष काही नाही. कागद मात्र अस्सल आहे."
(क्रमशः)