हिंडतो मी कधीचा विरागी !

..................................................
हिंडतो मी कधीचा विरागी !
..................................................

आस ठेवून हृदयात जागी !
हिंडतो मी कधीचा विरागी !

ठाव एका ठिकाणीच नाही...
जीव धावे दिशांतून दाही...
वाळवंटात किंवा तडागी...!

हिंडणेही कुठे नीट झाले ?
आडवे पाय पायात आले...
रोज खोळंबलो जागजागी !

ओसरीला तुझ्या आज आलो
थांबलोही...पुढेही निघालो
दुःखही चालले अग्रभागी !

मोह सारे जरी आत जागे...
मी स्वतःहून काही न मागे...
तृप्त मी ? की असे वीतरागी ?

भोगले मस्त आयुष्य कोठे ?
त्यागलेही असे काय मोठे ?
मी न भोगी; तसा मी न त्यागी !

शाप हा कोणता कोण जाणे
उत्तरांचेच झाले उखाणे...!
लाभले भाग्य; तेही अभागी !

* * *

गाइलो मी इथे...चूक होती
वेदना ही बरी मूक होती
वंचनेची मिळाली बिदागी !

साधली ही कशी काय लीला ?
चांदणे मी दिले मैफलीला...
- कोंडुनी अंतरी लाख आगी !!

* * *
हिंडतो मी कधीचा विरागी !

* * *
 
- प्रदीप कुलकर्णी

..................................................
रचनाकाल ः ११ व १६ नोव्हेंबर २००६
..................................................