वडील फारच हळवे झालेत,
खंतावत बसते आई.
जुन्या घराला, हे कसलं औदासीन्य गिळून बसलंय
आजकाल किणकिणत नाहीत अंगणातली विन्डचाईम्स,
पार आटून गेलाय लिंबोणीचा बहर.
मी मागे सोडून आलो होतो एक वहिवाट
एक परंपरा
एक भरघोस जमाव,
अनेक पिढ्यांचा
एक जिवंत इतिहास.
रस्ते वाहून गेलेत , यंदाच्या पावसात
पार उघडून उचकून गेलीए जमीन ,
माझ्या आत्मकथेतील अक्षरांसकट.
आता आताशा,
मी ऐकत बसतो
घरे उन्मळून पडण्याच्या कथा
सुकत चाललेल्या परंपरेच्या रोपट्यांकडून..
विभ्रम