राहून गेले

बोलणे कित्येकदा होऊन गेले
सांगणे प्रत्येकदा राहून गेले

सत्य उठुन दिसलेच नाही
उठून बघणे राहून गेले

आसवे रुसवे गेले विरोनी
हासणे स्मरणात राहून गेले

गुंग बघण्यात सर्वांसवे मी
पाहणे बरेचसे राहून गेले

वेळ अपुल्यांना असतो कधी
अनोळखी चौकशी करुन गेले

कोण चुकले हिशेब राहुद्या
जाउद्या व्हायचे होऊन गेले

पोरका एकटा नव्हतो कधीही
विरह माझ्यासवे नांदून गेले

काय शोधण्या मी आलो इथे
विसरलो,शोधणे राहून गेले !