पृथ्वी जागी होत आहे

प्राण्यांना शोधत आहे, मी जंगल शोधत आहे
नेसूच्या वस्त्रांपुरते मी वल्कल शोधत आहे

हे नागवलेले पर्वत, हे माळरान बोडके
वाऱ्यावर विहरत येती दुर्गंध नासके-कुजके
या पूज्य नदीचे झाले विष्ठा भरलेले डबके
ही रसायनांची गंगा भूजलात मिसळत आहे
अन् समुद्रलाटांवरती तेलाचा तवंग आहे

पाऊस अवेळी पडतो, मोसमात गायब असतो
ग्रीष्मात पूर येतो अन् आषाढ कोरडा जातो
का ऋतुचक्राची चाके एकेक लागली निखळू ?
पृथ्वीच्या शेंड्यावरचा तो बर्फ लागला वितळू

धोक्याची वाजे घंटा, जागा हो मनुजा आता
का बलात्कार पृथ्वीवर करसी तू येता-जाता ?
अद्याप तुझे पृथ्वीने अपराध घातले पोटी
त्या शिशुपालाचे शंभर, मनुजा तव कोटी-कोटी
जागते, होतसे कृत्या, अंगास झटकते धरती
वादळे सुदर्शन आणिक भूकंप वासवी शक्ती

देशांतर करता येते पृथ्वीच्या पाठीवरती
पण ग्रहांवरी ना दुसऱ्या करता येई तुज वस्ती
तुज ठिकाण नाही दुसरे, दुसरा ना कोठे थारा
ही घरटे आहे आणिक ही धराच आहे कारा...