सरकारराज

काळूराम पाटील बनगरवाडीतील बडं प्रस्थ. गेले दहा वर्षंपासून गावची सत्ता हातात. मोठी शेती, ५०-६० गाई-म्हशींचा गोठा, एक-दोन साखर कारखान्यांचे संचालक आणि राजकारणातलं वाढतं वजन. माणुस तसा चांगला. बोलायला एकदम मोकळा. मनात कही ठेवणार नाही. काय असेल नसेल ते एकदम तोंडावर बोलणार.

ह्या माणसाला एक चित्रपटांचं व्यसन सोडलं तर बाकी कसलं व्यसन नाही. व्यसन म्हणजे नुसतं चित्रपट पहायचा नाही तर त्या प्रमाणे वागायचा पणं!! मुन्नाभाई बघितल्यावर संजय दत्तसारखी वेशभुशा आणि केशभुशा केली होती. पाठीमागे वळवलेले केस, जीन्सची पँट, पांढरा शर्ट, कपाळाला टिळा असा अवतार. मुन्नाभाई सारख चालणं, बोलणं, वागणं!!! दैवयोगाने बाळू नावाचा एक 'सर्कीट' पण त्यांना भेटला. तो सुद्धा काळा शर्ट, जीन्सची पँट, गळ्यात माळा अशा अवतारात फ़िरायचा. नुसतीच बनगरवाडीच नाही तर अजुबाजुच्या ५-६ गावात ह्या मुन्ना आणि सर्कीटच्या दोस्तीची चर्चा होती. पण हाय!! संजय दत्त जेल मध्ये गेला आणि 'मुन्नाभाई' पाटिल परत 'काळूराम' पाटिल झाले.

काळू पाटीलचं मुन्नाभाईचं भुत उतरलं पण चित्रपट बघायचं वेड गेलं नाही. सरकारराज प्रदर्शीत झाला आणि विचारू नका!! काळूराम पाटिलनीं 'सरकार' व्हायचं खुळ डोक्यात घेतलं. गावात आल्या आल्या नेहमीच्या न्हाव्याकडे गेले.

"झिपऱ्या!!! आम्हास्नी सरकार कट पह्यजे!! "

"ह्यो कंचा कट??? "

"ह्यो बघ!!!! साल्या पिच्चर-बिच्चर बघत जा की!! " बाळू ने अमिताभ चा फोटो हातात देत झिपऱ्याला सुनावलं.

झिपऱ्याने एकवार फोटोकडे आणि एकवार काळू पाटील कडे बघितलं.

"ह्यो तर सादाच कट हाये!! "

"झिपऱ्या कट न्हाई, रंग बघ!! "

झिपऱ्याने परत फोटोतले अमिताभचे भुरे केस बघितले आणि काळू पाटलाचे मुन्ना ईश्टाईल तेल लावलेले काळे चपचपीत केस बघितले.

"व्हैल की!!!! " झिपऱ्या म्हणाला.

झिपऱ्याने 'रंग' कालवला. एकतासात काळू चे काळे केसं भुरे होउन गेले. केसांनंतर दाढीची पाळी. काळू पाटलाने झिपऱ्याकडून फ्रेंच स्टाईल दाढी बनवून घेतली.

"झालं!!! लै झ्याक दिस्त्यात आमचे सरकार!!! " झिपऱ्या म्हणाला!!!

"मायला तुझ्या!!!! झ्याक झालं!!! ह्यादाढीला रंग कोण लावणार व्हय??? " काळू पाटील चिडुन म्हणाला.

"दाढीला रंग???? "

"बाळ्या, ह्याला फोटू दाव रं!!! "

बाळ्याने फोटो दाखवत झिपऱ्याला म्हणाला, "ह्यो बघितला का दाढीचा रंग!!! "

या वेळेस झिपऱ्याने निरखून बघितलं. दाढीचा रंग पांढरा होता आणि काळू पाटलाच्या दाढीचा रंग काळा. त्याच्या उभ्या आयुष्यात त्याने कधी दाढी रंगवली नव्हती. चाचरत तो म्हणाला.

"दाढीचा रंग न्हाई बा!!! "

बाळ्याने काही न बोलता हातात वस्तरा घेतला आणि एकदा झिपऱ्याकडे नजर टाकली.

"न्हाई म्हणजी हाये, पण दाढीचा श्पेशल रंग संपला हाये!! शहरात गेलू की आणतोया!! आता दुसरा रंग लावतुया. "

बाळ्याने वस्तरा खाली ठेवला. 'सरकार' ची केशभुशा तयार झाली. दुकानाबाहेर पडणार इतक्यात 'सरकार' काळू पाटील म्हणाले.

"बाळ्या!!! हिकडं ये!!! ". बाळ्या आला.

"म्या सरकार वाटतो की न्हाई?? " काळू पाटील आरश्यात बघत म्हणाला.

"वाटतं की!!! बसं आता फ़कस्तं कापडं बदलायची. "

"व्ह्यय!! म्या सरकार वाटतो, मंग तु चंदर वाटायला नगं?? "

"म्हणजी सरकार??? " बाळ्याने बावचळून विचारलं.

"झिपऱ्या!!! भादरून टाक बाळ्याचं डोकं!!!! "

ते एकून बाळ्या दचकला. मनातल्या मनात च्यायला नस्तं झंझट गळ्यात आलं असं म्हणत एक प्रयत्न आपले केसं वाचवायचा केला. पण काळू पाटलाने सरळ दम भरला.

"मुझे जो सही लगता है वो मै करता हूं!!! चाहे वो किसिके खिलाफ क्यू ना हो!! झिपऱ्या घे वस्तरा. "

ह्या वेळेस झिपऱ्याने आनंदाने वस्तरा हातात घेतला. बघता बघता बाळ्याचा चमन गोटा झाला.

आता पुढची पायरी म्हणजे कपडे. काळा सदरा मिळाला, पण काळी लूंगी मिळता मिळेणा!!

"बाळ्या, लूंगी न्हाई गावली तर आम्हास्नी सरकार कोण म्हण्ण्यार???? "

"व्हय जी!!! लूंगी तर पायजे!! " चमन डोक्यावर हात फिरवत बाळ्या म्हणाला.

"मंग जा की शहरात! जाय २-४ काळ्या लूंग्या घेउन ये!!! "

१-२ दिवसातच बाळ्या २-४ काळ्या लुंग्या घेउन आला. बरोबर बिन-नंबरचा चष्मा आणि रुद्राक्षाच्या माळा पण आणल्या.

गावातल्या लोकांचा मात्र हा चर्चेचा विषय झाला. गावात वेगवेगळ्या चर्चा एकायला येत होत्या. कोणी म्हणे की काळू पाटलावर कोणितरी चेटूक केलं म्हणून म्हातारा झाला. कोणी म्हणे की काळू पाटील कोण्या बाबाच्या नादी लागला. काही म्हणाले की आता पांढरा शर्ट घालणारा बाळ्या मुन्ना आणि काळा सदरा घालणारा काळू पाटील सर्कीट. बाळ्याची मात्र चांगलीच पंचाईत झाली. गोटा केल्याने येता-जाता लोकं कोण मेलं म्हणून विचारत. सर्किट बनुन हिरोगिरी करता करता पोरी हसून बघायच्या पण आता बघून हसतात असं त्याला जाणवायला लागलं.

काळू पाटलाची बायको कमळी १५ दिवस माहेरी गेली होती. ती परत आली तेव्हा बाळ्या घरात काहीतरी करत होता. तीला ह्या 'सरकार' भानगडीची काही कल्पना नव्हती. तिला वाटलं की घरात कोणी चोरच शिरला. तिने काठी घेउन जोऱ्यात बाळ्याच्या डोक्यावर मारली आणि चोर-चोर ओरडायला लागली. त्या माराने बाळ्याच्या डोक्यावर भलं मोठं टेंगुळ आलं. वाचवायला आलेल्या काळू पाटलांनी कमळीला पकडलं, पण परीणाम उलटा झाला.

"मेल्या!!!  म्हाताऱ्या!!! अर्धी लाकडं म्हसणात गेली आणि बाईला धरतो व्हयं रं!!! घे तुला काठीचा हिसका दावते!!! "

त्या दोघाची ओळख लागेपर्यंत तिने काठीने काळू-बाळू चा चांगलाच समाचार घेतला. ३-४ दिवस दिवस लंगडणारा काळू आणि टेगुळवाला बाळू लोकांचा हसण्याचा विषय ठरले.

हळुहळू लोकांना समजलं की हा अवतार 'सरकारी' आहे. पण गल्लीतल्या कुत्र्यांना कसं समजणार?? त्यांनी काहीतरी वेगळाच समज करून काळू पाटलावर हल्ला केला. लुंगीत पाय अडकल्याने पळता पण येईना. शेवटी लुंगी सोडून  पळ काढावा लागला. बनगरवाडीला परत एक विषय करमणूकीला मिळाला.

येव्हढ होउन सुद्धा सरकार बनन्याचं भुत काळू पाटलाच्या डोक्यातून काही उतरेणा. ह्या अवतारात एकच कमी होती. "गोविंदा गोविंदा" गाण्याची. बाळ्याने त्यावर उपाय शोधला. त्याने एक पोरगा पकडून आणला ज्याच्या मोबाइलला तो रींग टोन होता. काळू पाटलाने रींग टोन सकट मोबाईलच विकत घेउन टाकला. पोराने खळखळ केल्यावर हातातली अंगठी देउन एक 'सरकारी' दम भरला. पोरगा मोबाइल च्या किंमती पेक्षा दुप्पट किंमतीची अंगठी आनंदाने घेउन गेला. दिलेली अंगठी सासऱ्याने दिलेली होती त्याच्यामुळे काळू पाटलाच्या बायकोने त्याची परत एकदा खरडपट्टी काढली.

बाळ्याने त्याबद्दल नारजी व्यक्त केल्यावर काळू पाटिलने एक सरकार चा डायलॉग एकवला.

"अपने उसुलोंपे चलने वालेको उसकी किंमत चुकानी पडती है!! "

आता डोक्यापासून पायापर्यंतचा अवतार सरकारला साजेसा झाला. पण धाक मात्र सरकारचा येत नव्हता. बाळ्याने काहीतरी करायच आणि काळू पाटलाचं नाव सरकार म्हणून स्थापित करायचा चंगच बांधला. लौकरच त्याला निवडणुकीला तशी संधी मिळाली. गावच्या लोकांना काळू पाटलाच्या बाजुने मतदान करायला तो धमकावू लागला.

पण हाय दुर्दैव. एक दिवस तो एकाला धमकवायला लागला तेंव्हा नेमका निवडणूक अधिकारी तिथे आला. अर्थातच बाळ्याला त्याची माहीती नव्हती. अधिकाऱ्याने त्याला त्याबद्दल विचारलं.

"मायला तुझ्या!!! तु कोण रं???? दाउ का सरकारी इंगा???? " बाळ्याने दरडावून विचारलं. अधिकाऱ्याने परत विरोध केल्यावर बाळ्याने त्याला 'आत' घेयचा हुकूम सोडला. अधिकाऱ्याला 'सरकार' समोर आणण्यात आलं.

अधिकारी म्हाणाला. "तुम्ही मला मारून मोठी चुक करताय!!!! हा गुन्हा आहे!!! "

"किसिको मारणा गुन्हा हाये!!! पण निवडणुकीच्या टायमाला मारणं राजकारण!!! " काळू पाटील आपल्या 'सरकारी' आवाजात म्हणाला.

इतक्यात कोणीतरी पाटलाला खरी माहिती सांगितली. काळू पाटलाने अधिकाऱ्याचे पायच धरले. अधिकाऱ्याने ऐकूनच घेतलं नाही. शेवटी काळू-बाळू ला जेलची हवा खायला मिळाली.

********************************************************************

जेल मध्ये काळू बाळू ला म्हणाला.

"मायला!!! मुन्नाभाई व्हतं तंवर कोणी जेल मध्ये टाकल न्हाई. "

"व्हय की!!! मला वाटतया की तुम्हास्नी हे काळे कपडे लै अपशकुनी हायेत!!!! "

"बरुबर म्हणतंयस गड्या..!!! सुटल्यावर पयले ही काळी लूंगी सोडणार!!! "

डोक्यावरून हात फिरवत बाळ्या पण मनातल्या मनात 'सुटलो' म्हणाला.