कैलासगड

कैलासगड

रविवार, १५ जून २००८. हरिश्चंद्रगड, जिवधन नाणेघाट वगैरे गेले दोन तीन ट्रेक म्हणजे मागे जाउन आलो त्याच स्थळांची उजळणी होते, पण या रविवारी कुठल्यातरी नव्या ठिकाणी जावे असे मनात होते.

सकाळी साडेसहाला मी, विनय, फदी, आरती, भक्ती, निलाक्षी, राधिका, पाचवीतली पूर्वा आणि स्वतः ट्रेकला येऊ न शकणारर्या मायबोलीकर हेमंतने उत्साहाने आमच्यात आणून सोडलेला त्याचा मुलगा राहूल असे नऊ जण पौड रस्त्याने निघालो. ठिकाण होते मुळशी धरणाच्या पाण्याने वेढलेला कैलासगड. त्याबद्दल फारशी माहिती नेटवर वा पुस्तकात नव्हती, पण धुमकेतू उन्हाळ्यात जाऊन आला होता, त्याच्याकडून माहिती घेतली होती.

शनिवारी तुफान पाउस झाला होता, त्याच्या खुणा रस्त्यावर दिसत होत्याच. हवेत मस्त गारठा होताच. पिरंगुट, पौड असे मुळशीला पोहोचलो, सरदारजीचे पॅराडाईस अजून उघडायचे होते, मग पुढे आशिर्वादमध्ये मिसळ चापून पुढचा प्रवास. जेमतेम दहा दिवसांचा पाउस झाला असेल, पण काय कायापालट होउन जातो आपल्या सर्व भागाचा. पंजाब किंवा केरळसारख्या सदा हिरव्या प्रदेशात जाणवत नाही, पण महाराष्ट्रात तर एवढा फरक की ह्याच का त्या पंधरा दिवसापूर्वीच्या उघड्या बोडक्या डोंगरदर्या असा प्रश्न पडतो. सकाळी लवकर निघाल्याने एक हरिण आणि काही पक्षीदर्शन घडलं. शिवाय कडेला करवंदाच्या जाळीत पिकलेली टपोरी करवंद.

उजवीकडे मुळशी धरणाचा जलाशय ठेवत पुढे ताम्हिणी घाटाकडे जाउ लागलो, या जलाशयातच त्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग करणारा रत्नागिरी डोंगर घुसला आहे, या डोंगराच्या एका सोंडेवरच कैलासगड आहे.
घाटाच्या थोडेसे अलिकडे एक रस्ता सह्यधारेच्या कडेकडेने लोणावळ्याकडे जातो. रस्त्याची परिस्थिती बिकट आहे, पण जीप वा बाईकने भर पावसात जायला यासारखा दुसरा रस्ता नाही. त्याच रस्त्याने पुढे गेलो, पिंपरीनंतर एक फाटा वांद्रे गावाकडे जातो, त्या रस्त्याने वांद्रे गाठले, आता पुढे वडूस्ते नावाचे गाव आहे, तिथे मात्र इथे पुर्वी रस्ता होता अशी शंका घेता येता येईल अशा वाटेने जाता आले. या रस्त्यात समोर एक आडवी भिंत दिसत राहते, तोच कैलासगड.
तीन चार धबधबे गडावरून खाली कोसळत होते, त्यातल्या एका धबधब्याजवळून वर जायला जवळची पण अवघड वाट आहे, आम्ही अजून तसेच पुढे गेलो, वडुस्ते गावातून एक सुनील नावाचा मुलगा वाट दाखवायला बरोबर घेतला आणि तसेच पुढे जात एका खिंडीत येऊन थांबलो.

गाडीतून उतरून उजवीकडे चढाई सुरू केली, पहिल्याच टप्प्यावर मागे वळून पाहिले तर तिन्ही बाजूंना विस्तीर्ण मुळशी जलाशय पसरला होता. अजून एका टेकाडाचा टप्पा पार करून एका छोट्या माथ्यावर आलो, असे अजून दोन टप्पे पार केले की गड हाताशी येईल असे वाटत होते, पण पुढची वाट वर न जाता गड उजवीकडे ठेवून वळसा घालू लागते. असा मोठा वलसा असेल तर वाटेत वरून येणारे अनेक ओढे, धबधबे लागणार हे आलेच, पण अजून ते खूप जोरात सुरू झाले नसावेत. वळसा झाला की पुन्हा एकदा वळून गड डावीकडे ठेवत वर चढलो आणि गडावर दाखल झालो आता डावीकडे एक वाट पुन्हा थोडी खाली उतरते, त्या वाटेने गेलो की खोडीव गुहांमधील पाण्याची टाकी पाहता येतात, गुहेच्या तोंडाशी उभे राहिले की वरून पाण्याचा एक पडदाच पडत असतो.

निघाल्यापासून दीड एक तासात आपण गडावर पोहोचतो. वर गडावर आता गवताचा हिरवा गालिचा तर विणायला सुरवात झाली आहेच, सह्याद्री स्पेशल अशी रानफुलांची झाडंही वर येत आहेत, पण एक 'शेलं' नावाची झाडही बरीच दिसली, त्यांची फळ चिकूसारखी लागतात असे सुनीलचे म्हणणे होते.

गडावर एक दगडांचा माळ आहे, उघड्यावरची कोरीव शिवपिंड आहे, तुफान वारा आहे आणि बाकी मोठ्या खेकड्यांचे साम्राज्य आहे. सुनीलने बघता बघता त्यातले पाच सहा मोठे खेकडे पकडून पिशवीत टाकले तेंव्हा पुढच्या रुचकर शक्यता माझ्या डोळ्यासमोर तरळल्या होत्या, पण नंतर ते काही वेळेच्या गणितात बसले नाही.

गडाच्या दक्षिणेला रत्नागिरी डोंगर आडवा पसरला असल्याने इतर काही दिसत नाही, पण बाकी तीन दिशांना खूप सुरेख देखावा आहे. मुळशीच्या पाण्यात सुसळे बेटही दिसते. तेही एक अवश्य जाण्यासारखे ठिकाण आहे.

थोड्या वेळाने खाली उतरलो, तिथेच एका पाण्याच्या टाकीवर बसून जेवलो आणि परत फिरलो. मात्र मुळशीकडे न वळता लोणावळ्याकडे वळलो, पान्नास किमीच्या या रस्त्यात वाटेत अंधारबन नावाचे जिथे दिवसाही सूर्यकिरण पोहोचत नाहीत असे जंगल आहे, पुढे वर्हाड्याचे सुळके, घनगड, तेलबैला, सालतर खिंड, अँबी व्हॅली, कोराईगड, शिवलिंग, असा रम्य प्रवास करत मग लोणावळ्याच्या गर्दीत अडकलो. थोडे आडबाजूला गेले तर किती रुद्रभीषण निसर्गसौंदर्य वाढून ठेवले आहे याची जाण नसलेली टुरिस्ट मंडळी करंगळीभर पाण्यात दोन पाचशेच्या झुंडीने लोळत होती. पण त्यांच्या हातातल्या बाटल्या पाहिल्या की यांना बाकी ठिकाणे माहित नाहीत तेच बरे असेही वाटते. तिथे तासभर अडकून मग पुण्याला पोहोचलो. दिवसभरातले अल्हाददायक वातावरण, पावसाच्या हलक्याच सरी यांनी मन एकदम प्रसन्न होउन गेले.

या पावसाळ्यात आता जरा आडवाटेचे चिंब भिजता येईल असे धबधबे, डुंबता येतील असे डोह, हिरव्या गवताचे मखमली गालिचे, रानफुलांचा बहर, वादळी पावसात थंडीने कुडकुडत असतांना एखाद्या झोपडीत मिळणारा गरम गरम वरण भात, तर बाहेर धो धो पाउस कोसळत असतांना चार हजार फुटांवर गुहेच्या उबदार आसर्याला बसून स्वतःच केलेले सूप, मॅगी, खिचडी, रस्सा असे काहीतरी चाखत निवांत आसमंत न्याहाळत राहणे असे बरेच काही करायचे आहे, त्याची सुरूवात तर झकास झाली आहे....