गुलमोहोर - १

उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. आणि तोही जेमतेम साडेदहा वाजताच. मी नुकताच सायकल शिकलो होतो आणि त्या कलेचा सराव करण्यासाठी आमच्या घरासमोरच्या सिंधी कॉलनी नावाच्या अतिगलिच्छ वस्तीतल्या रस्त्यावर चकरा मारत होतो. एकाहून एक गलेलठ्ठ बायका सलवार कमीज मध्ये त्यांची गुळाच्या ढेपीसारखी शरीरे कोंबून हातामध्ये स्टीलचे कडीवाले डबे हिंदकळवत इकडून तिकडे लगबगत होत्या. त्या डब्यांत बहुधा त्यांची ती तुपात थबथबलेली बटाट्याची भाजी असावी. आमच्या घरासमोरच्या हर्दवानी काकूंनी एकदा कुठल्याशा कारणाने ती भाजी आमच्याकडे पाठवली होती. ती संपवताना तर नाकी नऊ आलेच, शिवाय तो डबा धुताना त्याला चिकटलेले जे तूप होते, त्यात आमचा एकावेळेचा शिरा झाला असता असे आईने स्वच्छ सांगून टाकले. हे ऐकायला दुसरे कोणीच नसल्याने मी ते ऐकले आणि लक्षात ठेवले.

तर असे डबे घेऊन हाकारलेली ती गलबते चुकवताना मला सायकल चालवण्याचा चांगलाच सराव होत होता. तेवढ्यात मला समोरून टिप्या येताना दिसला. त्याचे खरे नाव टिपू, पण हाका मारताना टिपू पेक्षा टिप्या चांगले पडते. गावठी वाणाचा हा कुत्रा म्हटले तर अभयदादाच्या मालकीचा. पण ते बंधन ना कधी टिप्याने घालून घेतले, ना कधी अभयदादाने घातले. अभयदादाचे घर तसेही कोपऱ्यावरच होते, आणि त्याला आवारही नव्हते. रस्त्यावरून सायकल थेट त्या घराच्या पायरीला लागे. आणि आत मोजून दोन खोल्या. त्यामुळे हिरवेकाकूंनी टिप्याला घरात ठेवायला साफ नकार दिला होता. मग अभयदादा त्याला पायरीवरच शिळी पोळी घालत असे.

टिप्याचे पोट तेवढ्याने भरत नसावे बहुधा, कारण तो आमच्या घरीही राबता ठेवून असे. घरी तात्या नसले तर त्याला दूध मिळे. तात्या असले तर मात्र "या कुतरड्याला कुणी आणले इथे" असे गर्जत ते घर डोक्यावर घेत. तात्या भल्या सकाळी फिरायला जात आणि त्या वेळेला सगळी कुत्री त्यांना भुंकभुंकून हैराण करीत. त्यामुळे कुत्रा या प्राण्याबद्दलचा त्यांचा राग चांगलाच तीव्र होता.

तर हा टिप्या जरा भिरकटलेलाच होता. खाली मान घालून आपल्याच तंद्रीत तो भटकत असे. मग कुठल्या कोपऱ्यात दिसणाऱ्या मांजरांवर भुंकण्याचेही त्याला भान नसे. या गलेलठ्ठ शिंधीणी चुकवणे सोपे, कारण त्या सदैव भिरभिरत्या नजरेने आसपास पाहत मार्गक्रमणा करीत असत. टिप्याने एकदा का खाली मान घालून एक दिशा धरली, की त्यात कुठलाही बदल होत नसे. आणि त्याला हाक मारली तर तो ओळख दाखवेलच याचाही भरवसा नसे. नुकतेच एकदा माझ्या सायकलच्या पुढच्या चाकात घुसून त्याने मला पार लोळवले होते, त्यानंतर मी कायम त्याला बाचकून असे. त्यामुळे टिप्या दिसताच मी रस्त्यावरच्या दिव्याचा खांबाच्या तळाशी असलेल्या सिमेंटच्या गोल चौथऱ्यावर पाय टेकून उभा राहिलो. टिप्या डुलकावत येत होता.

त्याच रस्त्याने 'दिलबहार हॉटेल'च्या हिरू मोटवानीचे म्हातारे वडील "सांई, सांई" हा जप करत येत होते. एखाद्या मैद्याच्या पोत्यासारखे ते चहूअंगाने ओघळले होते. त्यांचे धोतर तर इतके ढिलावलेले असे, की ते सुटत कसे नाही असा प्रश्न पाहणाऱ्याला कायम पडे.

टिप्याने तो प्रश्न सोडवला. चालताना आपण टिप्याच्या मार्गात आहोत हे मोटवानी आजोबांना उमगले नाही. आणि मागील बाजूने टिप्याने त्यांच्या धोतरात मुसंडी मारली. धोतर सुटले. आणि "सांई, सांई"च्या पुटपुटल्यासारख्या चालणाऱ्या जपाचे "मारी गयो" या कर्णभेदक किंकाळीत रूपांतर झाले. त्या किंकाळीने मात्र टिप्या घाबरला, आणि त्या धोतराच्या गुरफट्यातून सुटायला त्याने जी मुसंडी मारली, त्यात सबंध धोतर रस्त्यावर अंथरले गेल्यावरच त्याची सुटका झाली.

मोटवानी आजोबा धोतराच्या आत त्याच रंगाची आणि चांगली गुडघ्यापर्यंत येणारी नाडीची चड्डी (नाडी आणि चड्डी दोन्ही गुडघ्यापर्यंत) घालायचे हे किती बरे झाले! मी मात्र धोतर कधी नेसायचे नाही, आणि नेसलेच तर रस्त्यावर कधीच बाहेर पडायचे नाही अशी खूणगाठ बांधून टाकली.

हसू आवरत सायकल चालवणे काही जमले नसते, म्हणून सायकल हातात धरून मी खुदखुदत घरी परतू लागलो. डांबर चांगलेच तापलेले होते. सायकल चालवताना जाणवायचे नाही एवढे. आता मात्र चपला चिकटतील की काय असे वाटू लागले. म्हणून परत सायकलवर टांग टाकायला पायडलवर पाय ठेवून दुसरा पाय जमिनीला रेटत वेग घेऊ लागलो, तर तिकडून माझ्या वर्गातला सोनुसिंग येताना दिसला. तो सायकलच्या मागच्या कॅरियरवर बसला होता आणि तिकडून पायडल रेटीत सायकल चालवत होता. ही विद्या बरी दिसली.

सोनुसिंग धनसिंग राजपूत एवढे घसघशीत नाव माझ्याबरोबरच्या ह्या एवढ्याशा मुलाचे असू शकते हे कळल्यावर मला पहिल्यांदा आश्चर्यच वाटले होते. "सिंग" हे शेपूट न जोडताही नाव घेता येते, आणि ते मूळ पाळण्यातले नाव असते (प्रताप, संग्राम, उदय आदी) अशी माझी समजूत होती. पण नुसतेच सोनू हे नाव, आणि तेसुद्धा मुलाचे, हे काही जमेना. आणि त्याचे पाळण्यातलेच नाव सोनुसिंग आहे असे त्याचे ठाम म्हणणे पडले. सोडून दिले.

"काय करू राहिला रे कौस्त्या? पांझरी चालवितो का? "

माझे नाव जरी कौस्तुभ असले तरी इकडे आल्यापासून ते सरळ उच्चारणारा एकही मित्र मला भेटलेला नव्हता. कस्तूब, कौतुभ, कौतिक, खत्तूब अशी माझी निरनिराळी बारशी झाली होती. त्यामुळे हे मी फारसे मनावर घेतले नाही.

"पांझरी? मी तर आत्ताशी सायकल शिकलो आहे" या माझ्या उत्तरात हसण्यासारखे काय होते हे कळले नाही. मग यथावकाश त्याने प्रकाश टाकला, की सायकलच, पण मागच्या कॅरियरवर बसून चालवणे म्हणजे पांझरी चालवणे.

कोंकणातून इकडे आल्यावर ज्या अडचणी प्रामुख्याने आल्या त्यात हे भाषिक पेच फार त्रासदायक होते. तोपर्यंत रत्नागिरी, पेण, पनवेल ही जी ठिकाणे हिंडून झाली होती, त्यांत भाषा बऱ्यापैकी सारखी होती. तात्यांची बदली इकडे बढतीवर खानदेशात झाली आणि हे भाषेचे लचांड उपटले.

भाषेचेच नव्हे, तर एकंदर वागण्याचालण्याचे वळण बरेच वेगळे होते इथले. साधे उदाहरण म्हणजे, बनियन आणि नाडीची चड्डी एवढी वस्त्रे अंगावर असताना घराबाहेर किती अंतर फिरता येऊ शकते याचे आडाखे. पेणेस माझ्या वर्गातला विनू तर पार दातार आळीपासून देव आळीपर्यंत (व्हाया बाजारपेठ) पल्ला या वस्त्रांवर काटत असे, आणि त्यात कुणालाही वावगे वाटत नसे. सहावीतल्या मुलाला याहून अधिक कपडे द्यायला कुणाचे पैसे वर आले होते?

इथे मी या कपड्यांवर एकदा पायऱ्या उतरून खाली रस्त्यावर आलो, तर गहजब झाला. शेजारच्या पालवेकाकू लगबगीने आमच्याकडे आल्या आणि सुरू झाल्या, "जोगबाई, तुमचा राजू (त्यांच्या मुलाचे नाव राजू असल्याने सगळ्या मुलांना त्या 'राजू' म्हणत; जोगांचा राजू, कोतकरांचा राजू इ. त्यात दोन मुले असली तर कोतकरांचा मोठा राजू आणि कोतकरांचा छोटा राजू) असं काय करू राह्यला? "

आईला लगेच, एका आईलाच येऊ शकते अशी, खात्रीवजा शंका आली, की मी काहीतरी आचरटपणा केलेला आहे. ती स्वैपाकात गुंगली की मी तिचा डोळा चुकवून नसते उद्योग करतो असे तिचे ठाम मत होते. ती हातात लाटणे घेऊनच "कौस्तुभ" असे गर्जत बाहेर आली. मी खरेच काही खोडी केली असती तर तिने चांगलाच हात साफ केला असता हे निश्चित. पण काहीच केले नसल्याने मी शांत होतो.

दोन्ही हात मोकळे, कपड्यांवर कुठेही चिखलाचे डाग नाहीत, अंगावर मारामारीच्या खुणा नाहीत, तेल लावून भांग पाडलेले केस अजून तसेच आहेत, अशा अवस्थेत मला पाहिल्यावर आईला काहीच उमगेना. इतके सगळे व्यवस्थित असताना पालवेकाकूंना काय झाले?

"असा खुल्ल्या अंगानं सडकेवर कशापायी जाऊ राह्यला? " पालवेकाकूंनी त्यांच्यापरीने खुलासा केला. आईला हे काही उमगले नाही. इथली भाषा एकंदरीत तिच्यापेक्षा मलाच जास्त उमगत होती. पण अखेर आईला काय ते कळले, आणि लगेचच मला दोन बंड्या आणि हाफपँटा शिवण्यात आल्या.

आणि भाषेचे तर किती मोठे लचांड! शिव्या कशाला म्हणावे याबद्दल इथल्या लोकांची मते फारच पुचाट होती. कोंकणातून आल्यामुळे, आणि आम्हा जोगांचे मूळ गांवही नांदिवडे (व्हाया जयगड) असल्याने, माझे भाषिक शिक्षण अगदी व्यवस्थित झालेले होते. परिणामी, माझ्या बोलण्यात "रांडेच्या, फोकळीच्या, झोंड, भोसडीच्या, भिकारचोट" आदी शब्द अगदी सढळ जिभेने वैरले जात.

पण या गावात ब्राह्मण हाताच्या बोटावर मोजण्याइतके. त्यात आम्ही एकुलते एक कोंकणस्थ. आणि गोरे घारे. माझ्या तोंडून ही रसवंती पाझरू लागली आणि सटासट हादरे बसू लागले. "तो म्हणे जोगबाईंचा कौतिक आहे ना म्हणे, तो ना म्हणे, खूप म्हणे शिव्या देतो म्हणे. आणि फक्त सातवीत आहे म्हणे" अशा बातमीपत्रांचे प्रक्षेपण महिलावाणीवर सुरू झाले. जिभेला वळण लावायला मला जवळजवळ अर्धे वर्ष लागले. नंतरचे अर्धे वर्ष बऱ्यापैकी शांतपणे गेले.

या वर्षी उन्हाळ्यात नांदिवड्याला जाण्याचा कार्यक्रम मार्च ऐवजी मेमध्ये करायचा असे ठरले. आबाकाकांनी काहीतरी घर उलगडून ठेवले होते की काहीतरी. 'वासे सगळे कुसून गेलेत, ते बदलायला हवेत' असे काही बोलणे चाललेले होते. मला नीटसे कळले नाही, पण "बँकेत काम करतो म्हणजे काय पैशांचे झाड आहे घरी असे वाटते की काय आबाभावजींना? " असे आईचे बोलणे एकदा पुसटसे ऐकले. थोडक्यात, या उन्हाच्या तल्खलीत अजून दीडेक महिना काढणे आले. जवळजवळ अख्खे वर्ष (दिवाळीत मी आजारी पडलो होतो) सलग कोंकणाबाहेर काढण्याचा हा पहिलाच प्रसंग. माझ्याच आयुष्यात नव्हे, तर आई-तात्यांच्याही. पण सायकल शिकल्याच्या आनंदात मी दीड महिना काढायला हसत तयार होतो. नांदिवड्याला मुळी सायकलच नव्हती. आणि असती, तरी सायकल चालेल असा धड रस्ता नव्हता.

"कौस्तुभ" आईची हाक दणाणली. म्हणजे आता परत जाणे आले. उन्हाळ्याच्या सुट्टीत नांदिवड्याशिवाय कुठे राहण्याची आईलाही सवय नव्हती. त्यामुळे ती बावरून गेली, आणि उगाचच "आता तू लहान नाहीस, मोठा झालाहेस चांगला" अशी प्रस्तावना करून तिला सुचेल ते मला करायला लावण्याचा तिने सपाटा लावला. गीतेचे अध्याय पाठांतराला घेऊन झाले. स्वत:चे कपडे स्वतः धुणे झाले. स्वैपाकात तिला मदत करणे झाले. पण एवढे करूनही मला मोकळा वेळ मिळे आणि आपले काहीतरी चुकले म्हणून ती कावरीबावरी होई. आज काय होते पटावर कुणास ठाऊक. जाऊनच बघायला हवे होते.

आज मजा होती. आईच्या हातात एक पत्र होते. समीरदादा येत असल्याची बातमी त्या पत्रात होती. समीरदादा म्हणजे रत्नागिरीला शिकायला असणारा विनूमामाचा मुलगा. त्याची नुकतीच बारावीची परीक्षा झाली होती. तो एकटाच इकडे येणार होता.

हैय्या हो! समीरदादा म्हणजे अनेकानेक गंमतगोष्टींचा खजिनाच होता. हे वर्षभर मी त्याला भेटलो नव्हतो, पण आधीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीपर्यंत दर वेळेला नांदिवड्याहून आईच्या माहेरी कोतळूकला जाण्याचा बेत निश्चित असे. तेव्हा समीरदादाही तिथे येई. मग काय! करवंदांच्या जाळ्या धुंडाळण्यापासून विहिरीवरचा पंप सुरू करून त्याच्या पाण्याच्या धोदाण्याखाली अंघोळ करण्यापर्यंत आणि दुपारी आवाज न करता माळ्यावरची आंब्यांची आढी चापसण्यापासून सकाळी चुलीला फणसाच्या आठळ्या भाजण्यापर्यंत मला एक भक्कम जोडीदार असे. आता इथे या सगळ्यातले काहीच नव्हते म्हणा, पण समीरदादा काहीतरी हुडकून काढील याचा मला भरवसा होता.

अजून गंमत म्हणजे तो जसा एकटाच इकडे येणार होता, तसा त्याला आणायलाही मी एकटाच स्टेशनावर जायचे असे आईने जाहीर केले. हा मला "मोठे" करण्याचा एक भाग होता बहुतेक. अर्थात आमच्या खाली राहणारे करंकाळ काका रेल्वेतच पार्सलक्लार्क होते. आणि पार्सल ऑफिस स्टेशनच्या मुख्य दाराला लागूनच होते. त्यामुळे माझे 'एकटे' जाणे हे स्टेशनच्या मुख्य दारासमोर उभे राहणे (तेही अशा जागी, की करंकाळ काकांना मी नीट दिसावा) एवढेच होते. हात्तिच्या! पण समीरदादा दोन दिवसांत येणार होता हे महत्त्वाचे.

या आनंदात मी परत बाहेर सायकल फिरवायला जाण्याचे प्रयत्न करायचेही विसरून गेलो. किंबहुना, शंकेला जागा नसावी म्हणून सरळ गीता उघडून झालेले पाठांतर तपासून पाहायला लागलो. आईचा चेहरा लगेच संशयी झाला. पण शोधशोधूनही तिला काही वावगे सापडेना. आता काय करावे या विचारात ती असतानाच "आशाकाकू, आहात का घरात" अशी हाक मारत ज्योत्स्नाताई आली. तिचे पप्पा (ती या नावाने त्यांना हाक मारे, ज्याची मला फारच अपूर्वाई वाटे), म्हणजे श्रीकृष्ण कुलकर्णी,   तात्यांसारखेच दुसऱ्या एका बँकेत होते. ज्योत्स्नाताईची दहावीची परीक्षा नुकतीच झालेली होती आणि ती पुढल्या महिन्यात आम्ही कोंकणात जायला निघणार होतो त्याच सुमारास सर्व कुटुंबीयासोबत काश्मीरला जाणार होती. त्यांची बँक सगळा खर्च देणार होती म्हणे. "आपली बँक असे काही का करत नाही? " या माझ्या प्रश्नाला तात्यांनी "अजून दोन वर्षांनी मिळेल आपल्यालाही असे जायला" हे भलतेच उत्तर दिले होते. दोन वर्षांनी मिळू दे नाहीतर सहा महिन्यांनी. आतापर्यंत का नाही मिळाले याचा खुलासा मला हवा होता. तो तात्यांनी केला नाही तो नाहीच.

ज्योत्स्नाताईचे आणि आईचे बरे जमे. त्यामुळे "तुझ्या जागी मुलगी असती तर एव्हाना कामाला हाताशी आली असती" हे तिचे संतापजनक पालुपद आता बरेच कमी झाले होते. मला घरातल्या कामाला जुंपून तर टाकायचे, आणि वर नसलेल्या मुलीचे गुणगान. असतीच मुलगी तर तिने असे काय केले असते जे मी करत नव्हतो? दोडक्याची भाजी खाल्ली असती की चहाचा हट्ट धरला नसता? उग्गाच काहीतरी!

सुरुवातीच्या काही दिवसांनंतर ज्योत्स्नाताईची आणि माझी चांगलीच गट्टी जमली होती. एकदम सुरुवातीला तिला माझी भाषा ऐकून जो धक्का बसला होता त्यामुळे ती लांबलांबच राही. पण मग श्रावणात आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती तेव्हा ज्योत्स्नाताई आणि तिची आई छायाकाकू दिवसभर आमच्याकडे मदतीला म्हणून होत्या. तेव्हा तिने मला 'लहरोंसे डरकर नौका पार नही होती' ही कविता किती छान समजावून सांगितली होती. आमच्या हिंदीच्या येवलेसरांना का जमत नसे असले काही? त्याची परतफेड म्हणून सत्यनारायणाच्या प्रसादाच्या मुदी पाडताना मूदपात्राला कसे आतून दुधाचे बोट लावायचे म्हणजे मूद अलगद पडते, आणि मूदपात्रात एक बेदाणा ठेवून मग त्यावर शिरा घालून मूद पाडली की कशी प्रत्येक मूद नेटकी दिसते हे मी तिला वेवस्थित दाखवले.

तर ज्योत्स्नाताई आल्यावर मी गीता सावकाश बाजूला केली (भसकन ठेवली असती तर आईने त्यावरून कांडायला घेतले असते, आणि तेही ज्योत्स्नाताईसमोर) आणि तिला माझ्या नवप्राप्त ज्ञानाने दिपवून टाकावे म्हणून विचारले, "ताई, पांझरी म्हणजे काय माहीत्ये? ". आता यात आईला मध्ये नाक खुपसण्यासारखे काय होते?   पण नाही. तिने लगेच "कौस्तुभ, काय वाभरटासारखे विचारतोस काहीही? " असे उगाचच हासडले. मी जरा हिरमुसला झालो. पण ज्योत्स्नाताईचे उत्तर ऐकून खदाखदा हसत सुटलो. "पांझरी म्हणजे ना, नदीचा छोटासा प्रवाह. पाणझरी चे पांझरी झालेले दिसते". बाकी काहीही माहीत नसले तरी ज्योत्स्नाताई बोलते मात्र अगदी ठासून हं. अर्थात तिला सायकलच चालवायला येत नव्हती, त्यामुळे पांझरीचा अर्थ कळूनही तिला फायदा नव्हता. आणि येत असती तरीही बायका पुढे दांडी नसलेली लेडीज सायकल चालवतात हे मला माहीत होते. ज्योत्स्नाताई तर परीक्षा झाल्यापासून फक्त निरनिराळ्या मॅक्स्या घालत असे, त्या घालून बसताच आले नसते कॅरियरवर दोन्ही बाजूला पाय टाकून. मॅक्सी फाटली असती.