पाटीवर काळोखाच्या लिहितात काजवे
अक्षरात गूढ लिपीच्या दिसतात काजवे
डोहात निराशेच्या मी, काजळी मनाला
आशेची मशाल होउन जळतात काजवे
जाताच बळी सूर्याचा, क्षितिजावर लालस
'साम्राज्य आपले आता' म्हणतात काजवे
काळोख क्रूर भवती अन, संघर्ष शिगेला
परजून अस्त्र इवलेसे लढतात काजवे
ठिणग्या विद्वेष सुडाच्या जातील लयाला
चांदण्यात हळव्या कोमल विझतात काजवे
कोणता ऋतू उर्जेचा आतून सळसळे
रात्रीच्या वेलीवरती फुलतात काजवे
फिरताच उन्हाची बोटे अस्तित्व पुसाया
पांघरून स्वप्न निशेचे निजतात काजवे