वळणावरती पाऊल वळले पाठीमागे
दोघांमधले नाते पडले पाठीमागे
मेघ जरासे डोंगरमाथा चुंबत गेले
आठवणींचे निर्झर झरले पाठीमागे
तिने अचानक पाठ फिरविली, खेद न त्याचा
दु:ख असे, सुख तिच्या धावले पाठीमागे
दोरी तुटली, पतंग सुटला, हातांमधुनी
तो गेला अन मन भरकटले पाठीमागे
सहवासाचे रंग खरे तर गहिरे होते
फक्त पोपडे का मग उरले पाठीमागे?
नकारातही तिच्या मिळाला एक दिलासा
जाता जाता तिने बघितले पाठीमागे
आरश्यास ती चरा जरासा पाडून गेली
तुकडे माझे पुरे विखुरले पाठीमागे
जीवनभर तर त्यांनी माझी सोबत केली
मी गेल्यावर का ओघळले पाठीमागे?