ओल

वेगळंच काहीतरी एक गाणं गुणगुणंत
एक पक्षी माझ्या दारात येउन बसायचा

बसायचा, गायचा आणि निघून जायचा.
मला त्याच्या गाण्याचा कळतो तितकाच अर्थ
त्याच्या येण्याचा नि जाण्याचाही कळत असावा
या विश्वासाने!

त्याला फांद्यांवर बसता येत नव्हते असे नव्हे; किंवा
माझ्या अंगणात पक्ष्यांनी बसावं अशी डेरेदार झाडं नव्हती
अशातलाही भाग नव्हे.

तरीही तो पक्षी वेगळंच काहीतरी एक गाणं गुणगुणंत
माझ्या दारात फरशीवर बसायचा

त्याच्या ओल्या बोटांची नक्षी उंबऱ्याबाहेर
मोहक उमटायची
जणूकाही गायला विसरलेल्या ओळीच लेखी मांडून जायची!

मला कुतुहल वाटायचं त्याच्या ओल्या पावलांचं
कुठं बर भिजून येत असेल हा रोज?

एकदा मी पहाटे पक्षाअगोदर उठलो,
बाहेर दूर लपून बसलो.

पक्षी झाडावरून उडाला आणि
माझ्या घराकडे येण्याअगोदर तो थेट
आऊटहाऊस मधील आईच्या खोलीत गेला

पारालिसिस झालेल्या तिच्या ओल्या उशीवर नाचला...
ती जरासं हसली,
ते हसू वेचून तो माझ्या अंगणात आला

आनंदानं ते हसू अंगणात उधळलं
आणि शब्दांमधून व स्वरांमधूनही पोहोचवायचे राहून गेलेले आशीर्वाद
उंबऱ्याबाहेर ओल्या रांगोळीगत रेखून गेला!

आता आईला दवाखाण्यात हलवल्यापासून
आऊटहाऊस पार चेंज झालंय
घराचं रिनोव्हेशन करतांना,
मुलाला स्वतंत्र जागा हवी असा विचार पुढे आला
शिवाय आई परत येईल इतपत तिची तब्यतही राहीली नाही
असं ही म्हणाली
आता अंगणात अधिक आकर्षक टाईल्स लावल्यात
आणि गार्डन मेंटेन करायला माळीही ठेवलाय

पण तो पक्षी हल्ली येतच नाही

आजकाल त्याचा दिवस उजाडत नाही की
सुकलेलं गाणं त्याच्या ओल्या स्वरात उमटत नाही कोण जाणे!

तश्याही आता टाईल्सवर रांगोळ्या उठून दिसत नाहीत
तरीही ही काढायच्या म्हणून काढते म्हणा अजूनही

पण कसा कोण जाणे माझा घसा कोरडा पडतो,
आणि नजर ओलावा शोधत राहाते रांगोळीतला...