देहात माझीया हा
चंद्र वितळून गेला ।
अन अंतरी मोगराही
सुगंध मिसळून गेला ।
झुकवुनी लाख पाहिले
नजरेस मी माझीया ।
तीर तुझ्या नजरेचा
काळजास वेधून गेला ।
बेरंगी दुनियेचा ना
कायदा मी मोडला ।
इशाराच एक तुझा
मज हाय रंगवून गेला ।
वेचियेली मी दुःखेही
माझ्या दोहो करांनी।
फासा दुर्दैवाचा मज
दान देऊन गेला ।
ओळखले नसे कधीही
माझ्याच मी जगाला ।
सौख्याचा क्षण मजला
नेहमीच फसवून गेला ।
गर्दीत अनोळख्यांच्या
मज मैत्र एक भेटला ।
जीवलगच तो जीवाचा
मग घाव घालून गेला ।
लाविले कसास माझ्या
मी प्रत्येक श्वासाला ।
क्षणाक्षणांनी काळही
मजला परखून गेला ।
शोधियले त्रिखंडात मी
त्याच सर्वेश्वराला ।
ऱ्हुदयीचा गाभारा पण
रिताच राहून गेला ।