थांग

भर सागराचा गेला, वाळूला कसली भ्रांत
सोबतीला तिच्या येई, वर निळे आसमंत
भर सागराचा गेला, लाटांनी देऊन जखमा
वाळूच्या हृदयी आता, आठवणींचा मुलामा
भर सागराचा आला, स्तब्ध वाळू नभासंगे
लाटांच्या जोरापुढती, भाव तिचा कैसा भंगे
भर सागराचा आला, आला-गेला मर्जी त्याची
खळाळत्या जोषामध्ये, त्याला तमा ना कोणाची
भर सागराचा गेला, तरी वाळू भिजलेली
लाटेमध्ये सागराच्या, ऊर्मी तिची गुंतलेली
भर सागराचा सांगे मीच स्वच्छंद आनंद
येता कुणी लाटेमध्ये होई तोच त्यात धुंद
वाळू कितीही लोटली हृदयात सागराच्या
कैसा तिजला लागावा थांग त्याच्या उधाणाचा?
सागराच्या नादात का तिने स्वच्छंद वाहावे?
उभ्या अनंत नभाला फुका झुगारून द्यावे?
सागराची असेना का किती उभार उतार
किनाऱ्यास वाळू राही, नभा वेढी सभोवार