एक नवीन आरती

आरती महागाई, दिसे तूच ठायी ठायी
परवडेना गाडी रिक्षा, आलो दर्शनास पायी   आरती महागाई

तुझ्या नावे वाढे भत्ता, होतो त्याचा चट्टामट्टा
पाठी पडे तुझा रट्टा, तुझा फिरे दांडपट्टा      आरती महागाई

झालो आम्ही पुरे खंक, वाढे तुझा निर्देशांक
बैलगाडी; फेरारी ही, विकूनिया झालो माँक  आरती महागाई

वडा झाला भजी एवढा, चहा कपाच्या तळाशी
नाश्त्याचे या सौ रुपया  तरी राहतो उपाशी   आरती महागाई

तुझ्यामुळे रोज आमची  होते महिना अखेर
रद्दी ज्यांची संपली ते,  विकतात फर्निचर     आरती महागाई

मेन्यूकार्ड हॉटेलचे  येतो पाहून माघारी
रेट आठवून तिथले, गोड लागते भाकरी      आरती महागाई

आजार  साजरे करतो, आम्ही काढुनिया ऋण
डॉक्टर दुरून दिसता, येतो घाम दरदरून    आरती महागाई

लाईटचे बील 'हेवी', येते डोळा अंधारून
होते बोलतीच बंद बील फोनचे बघून        आरती महागाई

वाढता वाढता वाढे, आहे खिशाला जे भोक
मरण महाग म्हणूनी, जगतात आता लोक   आरती महागाई