पडसाद सारे राहून गेले
मनाचे जरी बांध वाहून गेले
किती रे, किती मी तुला हाक मारू?
ओठातुनी शब्द परतूनी गेले॥
तपोनिष्ठ त्यागी, तपाचाच भोगी
विरक्तीतही तू तपस्यानुरागी
स्वताच्याच विश्वातला मग्न योगी
मनाचे तुझ्या द्वार ते बंद झाले॥
नको रे तुला ही वृथा याचना
ऐकू न येई तुला प्रार्थना
नसे ऐहिकाची तुला चेतना
व्रतस्था, व्रतानेच नादावले॥
तपाला कधी भोग जिंकून घेई?
तिथे वासनेचा असे पाड काही?
मनीं मात्र आंदोळते मूर्च्छना ही
तुला तोषवू? मीच मोहावले॥
तुझा तू सुखी रे भला बंद द्वारी
भली मी सुखी अन् तुझ्या रे विचारी
तपाचीच होऊन मी शस्त्रधारी
दिठीला मिटोनी तापसी आज झाले॥
शिवाच्या तपाला मिळे जोड साची
तपस्या फळें त्या उमेची---सतीची
कधी 'सांब' होई कधी 'अर्धनारी'
विदेहीपणी देह हे युक्त झाले! ॥
रचनाकाल : ललितापंचमी, शके १९३०.
४-५ ऑक्टोबर,२००८.