किती बोलते, बोलते मी तुझ्याशी
जरी ठेवते शब्द माझ्याचपाशी
कशी ही परीक्षा कडी संयमाची
-------स्वाधीन राहून अधीन होणे!
कधी शब्दही ना दिला-घेतला
तरी कौल असला मनाने दिला
कळले मला-----हे न कळते तुला?
--------कळूनी तुझे व्यर्थ सारे बहाणे!
तुला सोडुनी विश्व सारे पाहावे
मनाने, तरीही तुला न्याहळावे
भिडतो कधी ना डोळ्यास डोळा
--------जरी पाहशी--तेहि परकेपणाने!
ये ऐल थोडा, मी पैल यावे
जुळे चेतना--वेगळे का उरावे?
भले मौन राहो, मुळी न तुटावे
--------लुटावे तयाला---मनस्वीपणाने!