अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक--भाग-२

मागील भागात आपण अमेरिकन अध्यक्ष निवडणूक पद्धत पाहिली. मागील भाग वाचून त्यावर वाचकांनी प्रतिक्रियाही कळवल्या. त्याबद्दल धन्यवाद. आता या भागात आपण या वर्षीची निवडणूक याबद्दल माहिती मिळवू या.

यावेळेच्या निवडणुकीत 'रिपब्लिकन' पक्षाचे उमेदवार म्हणून 'जॉन मॅक्केन' हे सुरुवातीपासून पुढे होते. अपेक्षेप्रमाणे ते उमेदवार झाले पण. खरी चुरस 'डेमोक्रेटीक' पक्षात होती. 'बॅराक ओबामा' आणि 'हिलरी क्लिंटन' यांच्यात जोरदार लढत झाली. खरंतर माजी राष्ट्राध्यक्षांची पत्नी या नात्याने हिलरी यांचे पारडे जड होते. पण 'तरुण' उमेदवार ओबामा यांनी शेवटच्या क्षणी बाजी मारली. या लढाईत हरल्यानंतर हिलरी यांनी ओबामांची 'रनिंगमेट' व्हायला पण उत्सुकता दाखवली होती. पण ओबामा यांनी 'जो बायडेन' यांची निवड केली. जो बायडेन हे भारतधार्जिणे म्हणून ओळखले जातात. म्हणूनच त्यांचा प्रतिस्पर्धी आणि मॅक्केन यांचा रनिंगमेट म्हणून भारतीय वंशाचे ल्युझियानाचे गव्हर्नर 'बॉबी जिंदाल' हे चर्चेत होते. पण मॅक्केन यांनी अनपेक्षितपणे अलास्काच्या गव्हर्नर 'साराह पेलन' यांची निवड केली. पेलन यांचा राष्ट्रीय राजकारणातला अनुभव कमी असला तरी स्वच्छ चारित्र्य आणि महिलांची सहानुभूती ह्या त्यांच्या जमेच्या बाजू.

या वर्षीच्या निवडणूकीतले योद्धे--

*रिपब्लिकन पक्ष--राष्ट्राध्यक्ष उमेदवार---जॉन मॅक्केन   , उपराष्ट्राध्यक्ष उमेदवार---साराह पेलन[स्पेलींगप्रमाणे-पलीन पण पेलन उच्चार करतात.]

*डेमोक्रेटीक पक्ष--राष्ट्राध्यक्ष उमेदवार---बॅराक ओबामा  , उपराष्ट्राध्यक्ष उमेदवार---जो बायडेन[बिडेनही म्हणतात]

अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक कायम काही ना काही सबळ मुद्द्यांवरून होत असते‌. साधारणपणे 'परराष्ट्रधोरण'  हा एक मुद्दा कायम असतोच. पण या खेपेस 'आर्थिक  मंदी' हा मुद्दा अचानक समोर आलेला आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेली 'लेहमन ब्रदर्सची' दिवाळखोरी आणि त्याच मार्गावार जाताजाता वाचलेल्या 'ए आय जी '  ,'वॉशिंग्टन म्युच्युअल' या वित्तीय संस्थामुळे अमेरिकन शेअरबाजाराला जोरदार झटका बसला. त्यामुळे अमेरिकन बाजारात हळूहळू पसरलेली मंदी अचानक जगासमोर आली. त्याचबरोबर नोकऱ्यांमधील कपात, पेट्रोल दरवाढ इ. मुद्देपण उपस्थित झाले. [अमेरिकत पेट्रोलला गॅस म्हणतात. ] ओबामा कॅंपमधील  लोकांनी बुश प्रशासनाला या साऱ्याला जबाबदार धरले आहे. खरंतर ज्या गॅसच्या वाढलेल्या किंमतींविषयी इतकी ओरड चालू आहे त्याची भारतातली किंमतीशी तुलना केली तर ती खूपच कमी आहे. सध्याच्या किंमती साधारणपणे ३.५ ते ४ डॉलर्स 'प्रतिगॅलन' म्हणजेच साधारण ४० ते ५०रु. प्रतिलीटर. इथले राहणीमान लक्षात घेता ह्या किंमती भारतापेक्षा खूपच कमी आहे.

इथली एक चांगली पद्धत म्हणजे इथे होणारे 'प्रेसिडेन्शियल डिबेट'. इच्छुक उमेदवारांमध्ये २ ते  ३ वादविवादांचे फड रंगतात. मंचकावर उमेदवार आणि समोर एक सूत्रधार असा हा जाहीर फड साधारणपणे दीड-दोन तास रंगतो. आरोप- प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडतात. या वेळेस पहिला फड सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'ओबामा' आणि 'मॅक्केन यांच्यात रंगला. आपल्याकडे क्रिकेटची मॅच ज्या उत्सुकतेने टीव्हीसमोर बसून पाहिली जाते तसाच हा प्रकार पाहिला जातो.यावरून तुम्हाला उत्सुकतेची तीव्रता जाणवली असेल.त्याच्या आधी आणि आणि  नंतर राजकीय विश्लेषकांच्या चर्चा होतात. कोण कसा बोलला, कोणी-केव्हा-कशी-कोणत्या मुद्द्यावर बाजी मारली याची सविस्तर चर्चा होते. अनेकजण या विवादावर आपले मत कोणाच्या पारड्यात टाकायचे हे ठरवतात.१९४८पासून ही वादविवादाची पद्धत पडली आहे. सुरुवातीला याचे प्रसारण रेडिओवरून होत असे. १९६०पासून टीव्ही आला. त्यामुळे उमेदवाराची 'बॉडी लॅग्वेज'हाही एक प्रभाव पडण्याच्याद्रुष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरू लागला.

या खेपेच्या पहिल्या डिबेटच्या आधी काही दिवसच आर्थिक संकट चालू झाले. बुशप्रशासनाने शेअरबाजार सावरण्यासाठी आणि काही अर्थसंस्थाना वाचवण्यासाठी ७००बिलियन डॉलर्स[साधारणपणे ३लाख कोटी रुपये]  ची मदत द्यायची योजना आखली‍. जॉन मॅक्केन यांनी पुढाकार घेवून हे विधेयक पास करावे यासाठी वॉशिंग्टनमध्ये मुक्काम ठोकला. त्यामुळे डिबेटची तारीख पुढे ढकलण्याच्या हालचाली चालू झाल्या. पण ओबामा कॅम्पने मॅक्केन घाबरल्याची हाकारी सुरू केली. आणि मॅक्केनने डिबेटला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. काही बाबतीत भारताशी साम्य आहे. जसे आरोप- प्रत्यारोप. मनुष्यस्वभाव......... असो....

ह्या आर्थिक मदतीवरून , बुश प्रशासनाला प्रचंड विरोध होत आहे. ह्या आर्थिक मदतीचे चित्र माध्यमांनी अशा पद्धतीने पेश केले की, सामान्य माणसाच्या खिशातून कराचा पैसा काढून बुडीत चाललेल्या कंपन्यांना देण्यात येणार आहे. ह्या मदतीचा भार प्रति मनुष्य २२००डॉलर्स किंवा प्रति कुटुब ६०००डॉलर्स पडणार आहे. अशी सगळीकडे चर्चा आहे. ह्या बुडीत कंपन्यांच्या सीईओंना हेलिकॉप्टरमधून फिरायला  आम्ही आमचा पैसा का द्यायचा? असा त्यांचा सवाल आहे. म्हणूनच खासदार या मदतीच्या विधेयकाला पाठिंबा द्यायला घाबरतात. जॉन मॅक्केन यांनी स्वतः जोर लावूनसुद्धा त्यांच्याच पक्षातील दोन त्रुतीयांश खासदारांनी विरोध करून हे विधेयक नाकारले. त्याचमुळे या महत्त्वाच्या मुद्द्यावरून मॅक्केन यांची पिछेहात झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान याच आठवड्यात उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांची 'वादसभा' झाली. 'डेमोक्रेटीक' पक्षाचे 'जो बायडेन' यांचा राजकारणातील अनुभव मोठा आहे̱. गेली ३० वर्षे ते 'सिनेटर' म्हणून अमेरिकेच्या राष्ट्रीय राजकारणात आहेत. ओबामा यांनी याच कारणासाठी [आपला अननुभव भरन काढण्यासाठी] त्यांची 'रनिंगमेट' म्हणून मानलं जातं. याच्याविरुद्ध पेलन यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अनुभव कमी आहे. त्यामुळेच बायडेन यांच्यासमोर पेलन कशी टक्कर देतात याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यांच्यावर मॅक्केन यांची 'बेल-आऊट[आर्थिक मदत विधेयक प्रकरण] प्रकरणात झालेली पिछेहाट भरून काढायची होती. त्यामानाने पेलन यांनी वादसभेत चांगला प्रभाव पाडला असे मानले जाते. बायडेन यांनी उपस्थित केलेल्या अडचणींच्या मुद्द्यांना बगल देवून आपले सशक्त मुद्दे समोर आणण्याचे मुरब्बी राजकारण्याचे कसब त्यांनी दाखवले. गव्हर्नर असल्याने राज्य चालवण्याचा अनुभव आपल्याला आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. चारही उमेदवारांम्ध्ये त्या एक्ट्याच गव्हर्नर आहेत. इतर तिघे सिनेटर आहेत. मजेची गोष्ट म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या इतिहासात अनेक राष्ट्राध्यक्ष आधी एकतर गव्हर्नर होते किंवा सिनेटर. काहीजण युद्धतील कर्तबगार होते. उदा--जॉर्ज वॉशिंग्टन. एकचजण ह्या कोणत्याही प्रकारात नसलेला 'डार्क हॉर्स' होता तो म्हणजे'जिमी कार्टर'.

आता पुढच्या भागात पाहू या--मॅक्केन आणि ओबामा यांच्यात रंगलेल्या पुढच्या वादसभा आणि निवडणुकीच्या वादळात घोंघावणाऱ्या घटना.

क्रमशः----