ह्यासोबत
जून महिन्यात मी अमेरिकेत आलो. मला जूनमध्ये इकडे यायला लागेल हे जेव्हा समजले तेव्हा नवीन देश जवळून पहायला मिळणार या आनंदाबरोबरच अजून एक आकर्षण खुणावत होते ते म्हणजे,' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक!! ' आणि इथे आल्यापासून मग निवडणूक आणि त्याबद्दल माहिती करून घेणे हा एक छंदच जडला. एक आवड म्हणून. मला जे वाटले, ते मी मनोगतींना सांगायचं ठरवले. म्हणून हा शब्दप्रपंच...
जूनमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा 'डेमोक्रेटस' आणि 'रिपब्लिकन'हे दोन्ही पक्ष आपापला अध्यक्षीय उमेदवार निवडण्यात गुंतलेले होते. अमेरिकन अध्यक्षाची निवडणूक ही फक्त अमेरिकेपुरती न राहता साऱ्याजगाचे त्याच्याकडे लक्ष लागलेले असते. अमेरिकन जनतेबरोबरच जगातील इतर अनेकांचे हितसंबंध त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंतलेले असतात.
अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक पद्धतीनुसार अध्यक्षांची आणि उपाध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून होते. उलटपक्षी भारतातील संसदीय पद्धतीत पंतप्रधान आणि राष्ट्र्पती ही दोन्ही पदे लोकप्रतिनीधीच निवडतात. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष 'जॉर्ज वॉशिंग्टन'यांची थेट निवड झाल्यानंतर १७९६ पासून निवडणूक सुरू झाली. जरी या निवडणूकीत कितीही पक्षांना भाग घेण्याची मुभा असली तरी मुख्यत्वे दोनच पक्ष यामध्ये भाग घेत आलेले आहेत. सुरुवातीला एकाच पक्षाचा भाग असलेले 'रिपब्लिकन' आणि 'डेमोक्रेटस' गेले कित्येक वर्षे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. जगावर साम्यवादाचा पगडा पडला होता त्या काळात 'सोशालिस्ट' नावाचा एक पक्ष उदयाला आला होता. पण तो फार काळ टिकला नाही. भांडवलशाहीचा पगडा असलेल्या अमेरिकेला समाजवाद रुचला नसावा. तसेच वेळोवेळी तात्कालिक मुद्दे घेवून काही पक्ष उदयाला आले होते. पण एका निवडणुकीपेक्षा जास्त मजल मारू शकले नाहीत.
निवडणुकीतले दोन्ही प्रमुख पक्ष आपापला उमेदवार लोकशाही पद्धतीने निवडतात. मग हे दोन्ही उमेदवार आपापला रनिंगमेट म्हणजेच 'उपाध्यक्ष्पदाचा' उमेदवार निवडतात. आणि मग चालू होते निवडणुकीचे महायुद्ध.
अमेरिकन घटनेप्रमाणे राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाल ४ वर्षाचा असतो. म्हणजेच हे युद्ध दर ४ वर्षांनी रंगते. निवडुकीची तारीखही ठरलेलीअसते. लीपवर्षाच्या नोव्हेंबरमधल्या 'पहिल्या सोमवारनंतरचा मंगळवार'. यात बदल होत नाही. त्यानंतरच्या जानेवारीत मग निवडलेला अध्यक्ष पदभार स्विकारतो. निवडणुकीचे पडघम साधारण १ वर्ष आधीपासूनच वाजायला लागतात. दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवार पक्षांतर्गत प्रचार सुरू करतात. साधारणपणे एप्रिल ते मेपर्यंत दोन्हीपक्षांचे उमेदवार ठरतात.
अमेरिकन घटनेप्रमाणे जरी अध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जात असला तरी मतदानाची पद्धत सरळ नाही जरा गुंतगुंतीची आहे. जितके मतदार मतदान करतील तितकी मते असे साधे सरळ गणित नाही. प्रत्येक राज्याला स्वतःचे वजन असते. उदा--टेक्सास, न्यूयॉर्क, फ्लोरिडा. या राज्यांना स्वतःचे वजन आहे. जितके त्या राज्यातील लोकप्रतिनिधी तितके त्या राज्याल वजन. आपले उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रातून ४८ खासदार निवडले जातात, म्हणून राष्ट्र्पतींच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकांच्या मताला वजन ४८. असो.
सांगायचा मुद्दा असा की, या पद्धतीमुळे उमेदवारही वजनदार राज्यांकडे जास्त लक्ष ठेवून असतात. आपल्याकडे जसे एकटा उत्तरप्रदेश देशाच्या राजकारणाची दिशा ठरवू शकतो, तसे इथे टेक्सास, न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियासारखे वजनदार राज्य निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.
तर ही झाली अमेरिकन निवडणुकपद्धतीची माहिती. आता पुढील भागात या वर्षीच्या निवडणुकीबद्दल जाणून घेवू या.
क्रमशः---------