शिंतोडा

चादर नाही, छप्पर डोक्यावर नाही
या रस्त्यांवर स्वप्नांचा वावर नाही

काल नफ्याने भिजले जे; या तोट्याचा -
शिंतोडाही त्यांच्या अंगावर नाही?

मंदी, युद्ध... तुम्हाला विषय चघळण्याचे
पोट तुम्हा लोकांचे हातावर नाही

रोजच पाणी देतो रोपांना, आता -
फार भरवसा या आभाळावर नाही!

सत्य हरवले छाया-पडछायांमध्ये
सूर्य कुणाचाही का माथ्यावर नाही?

खेळ सुरू ठेवा अवकाशप्रयोगांचे
माझी भाकर मंगळ-चंद्रावर नाही

कसली खोगिरभरती करता हो देवा
घट्ट कुणाची मांडच जगण्यावर नाही

फार अपेक्षा करणे मी सोडून दिले...
राग मलाही आता माझ्यावर नाही!

* मायबोलीच्या कार्यशाळा-२ दुवा क्र. १ मध्ये लिहिलेली गझल