कारापुर हे कर्नाटकातील एक छोटेसे खेडे. बंगलोर पासून २२० किमी तर म्हैसूर पासून ८० किमी अंतरावरचे हे छोटेसे गाव नागरहोळ्ळे अभयारण्याच्या दक्षिण पूर्वेस वसलेले आहे. इथे एका खाजगी विश्रामगृहात एक दिवस मुक्काम करून आम्ही पुढे मडिकेरीला जाणार होतो. मुख्य रस्ता सोडल्यावर सुमारे २० किमी सामसूम भागातून प्रवास केल्यावर आम्ही मुक्कामावर पोचलो. खरेतर आमचा १० जणांचा चमू होता. आम्ही बंगलोरहून म्हैसूर व तिथून कूर्गला जाणार होतो, पण मेव्हण्याच्या एका मित्राने आम्हाला कबिनी विषयी आग्रहाने सांगितले. वास्तविक अशा ठिकाणी जायचे म्हणजे मला पर्वणी! भ्रमणध्वनीच्या लहरी खऱ्या अर्थाने 'लहरीनुसार' पोचणार, सुसज्ज विश्रामगृहात दूरचित्रवाणी संच नामक नतद्रष्ट प्रकार नाही आणि कसलीही खरेदीची जागा व पर्यायाने गर्दीही नाही अशा ठिकाणी जाणे म्हणजे सुखाची सर्वोच्चा कल्पना. मात्र बरोबर पत्नी, मुलगा, मावशी, मावसबहिणी, त्यातल्या एकीचा नवरा व छोटा मुलगा, माझी बहिण व तिची मुलगी (मेहुणा काही कारणास्तव उशीरा म्हणजे थेट मडिकेरीला सामिल होणार होता) असा प्रचंड काबिला असल्याने व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तिनुसार कुणाला हे कितपत आवडेल या विषयी मी जर साशंकच होतो. पण नेहेमीच प्रेक्षणिय स्थळांचे धावते दर्शन, वेळापत्रक, रांगा यापेक्षा एक दिवस आणि दूरदर्शन व कलकल याव्यतिरीक्त एक रात्र घालवायची कल्पना सगळ्यांनाच पसंत पडली.
आम्ही पोचलो जरा उशीराच (म्हैसूर मध्ये साड्या, उदबत्त्या, चंदनी देव्हारे/ भेटवस्तू मिळतात. ). उशीरा निघाल्यावर उशीराच पोचणार! विश्रामगृहाच्या परिसरात दाखल होताच सेवकवर्गाने सामान ताब्यात घेत सर्वांना 'स्वगतपेय' दिले. भर उन्हातून आल्यावर गवताने शाकारलेल्या गोलाकार कुटीत बसून शहाळे पिण्याची कल्पना फारच सुखावणारी होती. आपापली कुटी ताब्यात घेउन जेवायला आलो तेव्हा तीन वाजले होते. जेवत असतानाच जंगल सफर आयोजक सांगत आले की पाच वाजता दोन तासांचा अभयारण्याचा फेरफटका आहे. जीप व यांत्रिक होडी असे दोन पर्याय होते. आम्ही होडीतून जायचे ठरवले.
नेहेमीपेक्षा जरा वेगळे म्हणून. म्हणजे आपण पाण्यात व प्राणी किनाऱ्यालगतचा जंगलात असा जरा वेगळा अनुभव. कबिनी ही कावेरीची उपनदी. मे महिन्यात देखिल निळ्या पाण्याचे विस्तिर्ण पात्र पाहून मी हरखून गेलो. या नदीतून दोन तास प्रवास केला तर तामिळनाडू, केरळ व कर्नाटक अशा तीन राज्यांची सफर होते.
कबिनी परिसर हा एकेकाळचा म्हैसूरच्या महाराजांचा शिकारीचा आवडता भाग. सध्या हा भाग अभयारण्यात येतो. या भागात गौरेडा, हरणे, सांबरे, बिबटे, वाघ, जंगली कुत्रे असे अनेक प्राणी वास्तव्य करून असले तरी हा भाग हत्तींसाठी प्रसिद्ध. नदीतून आत खोलवर दाट जंगलाच्या किनाऱ्याने गेले तर नदीकाठी मुक्तपणे विहरणाऱ्या हत्तींचे कळप पुष्कळ दिसतात असे ऐकले होते. हत्ती दिसताच नावाडी गती संथ करीत मोक्याची जागा हेरतो आणि पाण्याच्या खोलिचा अंदाज घेत नाव किनाऱ्याच्या शक्यतो जवळ नेउन यंत्र बद करतो आणि नाव स्थिर करतो. एका ठिकाणचे हत्ती बघून झाले की दुसरीकडे. खरेतर हा दोन तासांचा नौकाविहार म्हणजे एक सुंदर अनुभव आहे, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी. आज फक्त हत्ती!
अखिल नागरहोळ्ळस्थ हत्तींचे विराट संमेलन
एक दुर्मिळ दृश्य - हत्तीबाळाचे दुग्धपान
'मुखसुद्धी? ' बहुधा भोजनोत्तर मुखशुद्धीखातर हे महाशय तृणांकूर चघळीत असावेत
'आपल्याच मस्तीत दंग' असलेले हे नर्तनमुद्रेतले गजराज
आमच्या कॅमेऱ्यासाठीच हे महाशय जणू 'चल टिप लवकर' अशा आविर्भावात उभे ठाकले होते
थंडाव्यासाठी दूर्वास्नानात रंगलेले हे महाशय
'आम्ही दोघे आणि आमचे दोघे'
'सुरक्षा कवच' - हत्ती सारखा महाकाय प्राणी, त्याचे बाळही महाकाय. पण तरीही हत्ती आपल्या बाळाला
नेहेमी मध्ये घेउन चालतात
जर पिल्लू भरकटू लागले तर आई-बाबा त्याला पुन्हा मध्ये घेतात