हाय! लिहीलेस काय लेखा
भाळी धुसरशी रक्तरेखा
अजूनी हाती, पान मेंदीचे
अजूनी ओले, अंग हळदीचे
रात्र उंबऱ्यात शोधिते स्वप्ने
अजूनी कोरे, भाव धुंदीचे
विसकटला ना, जुडा ही पुरता
शेजेवरचा, सडा ही पुरता
प्रणयगीत ही थबकले अधरी
हिरमुसलेला, विडा ही पुरता
बिंब दर्पणात एकटे उरले
लाजले ना ते, हासले, रूसले
साजश्रुंगारा, रंग ही परके
धवलसे अवघे, सोहळे सजले
प्राक्तनाची होऊनिया बळी
फुलण्याआधी, चुरगळली कळी
दुर्लक्षिले मज, तूच वाल्मिका
मर्यादेची पायी साखळी