मोनालिसा

कॅलेंडरच्या सनावळ्या बदलताहेत
आणि भिंती तशाच पोपडे उडालेल्या
वाढताहेत चौकाचौकात हात उंचावलेले पुतळे
आणि कटाऊटस.
पुन्हा त्यांच्या सावलीत एखादे गरोदर दु:ख
आपल्या हाताच्या रेघा न्याहाळत
लाभेल त्या झेंड्याच्या नावाने
"मायांनो, बहिणींनो, लेकींनो"
सभा, परिषदा, मोर्चे, स्त्रीमुक्तीचे लढे
अंतराळाच्या झेपेपासून रॅंपवर घसरलेल्या कपड्यांपर्यंतची प्रगती
तरीही किटीपार्ट्यांच्या रिकाम्या कपात साचून राहीलेली प्रश्नावळ
तीस टक्क्यांच्या गदारोळात हरवलेली समता
न्यायदेवतेच्या आसनाला बगल देत हुंड्याच वळण
आणि स्वयंपाकघरात अजून एक जळण
तिच्या जळत्या निखाऱ्यावर नेहमीचं पाणी
एकदाच चर्रर्रर्र.........
मग सार थंड.... राखेच्या ढिगाऱ्यात
मी मात्र बंदिस्त माझ्याच कोषात
चेहऱ्यावर एखाद्या गुढ हास्याचं ओझ घेऊन
काळाच्या चौकटीत
प्रत्येक प्रश्नचिन्ह खंबीर जुन्या गंजलेल्या गजासारखा
माझं जळणं त्याना दिसतच नाही
जळणाऱ्याने रडणं जरूरी असतं का?