मृत्यू
तुमच्या-माझ्या सभोवताली क्षणोक्षणी वावरतो मृत्यू!
कधी स्फोटके, केव्हा गोळी; कधी गळाही चिरतो मृत्य़ू!
तोंड ठेवले बंद तरीही घडायचे ते कधी न थांबे...
देशाच्या पोटात असा हा डोळ्यांदेखत शिरतो मृत्यू!
शौर्य-धैर्य़ वीरांचे बघुनी मनात होतो खजील आणिक
नेता नेता धुरंधरांना अजरामरही करतो मृत्यू!
निःशस्त्रांचे तेज पाहुनी, ओज पाहुनी तोही खचतो...
जरी वाटते, अता जिंकला; पण कायमचा हरतो मृत्यू!
गरिबाच्या मरणाचे 'त्यांना' कोरडेच येतात हुंदके...
नातलगांच्या डोळ्यांमधुनी थेंब थेंब मग झरतो मृत्यू!
- प्रदीप कुलकर्णी
रचनाकाल ः ३० नोव्हेंबर २००८