घोडा

अनेक क्षुद्र निर्णयांपासून ते पार सप्तक लागेपर्यंतच्या अनेक गोष्टीत सामील असलेल्या मित्रांचे मी स्वागत केले.
एक मित्र म्हणाला, चांगला घोड्यावरून चालला होतास. पण तुला पायी चालायची दुर्बुद्धी सुचली.
दुसरा मित्र म्हणाला, अरे त्याच्यात प्रथमपासूनच भूतदया आहे.
एक मित्र म्हणाला, भूतदया काय बरोबर घेऊन हिंडायची वस्तू नव्हे.
मग तिसरा एक मित्र म्हणाला, म्हणजे भूतदया काय वाटेल तेव्हाच पिशवीतून बाहेर काढायची?
यावर एक मित्र म्हणाला, अर्थात, जे तुम्हांला दुसऱ्याला द्यायचे आहे ते गरज असेल तसे, जमेल तसेच देत गेले पाहिजे.
मग दुसरा मित्र म्हणाला, अरे पण याची भूतदया अंगभूत आहे.
भीषण हसत एक मित्र म्हणाला, म्हणजे भूत कॉमन.
यावर आम्ही कुणीच हसलो नाही.
मग तो म्हणाला, भूतदयेनी तरी हसा.
यावर मी खरंच हसलो.
मग तो पुढे म्हणाला, तेव्हा घोडा ही सोय आहे. तिथे भूतदया काय कामाची?
मग तिसरा मित्र म्हणाला, असं कसं? असं कसं? घोड्याला जीव आहे.
जीव तर घोड्याच्या टाचेखाली मारल्या जाणाऱ्या किड्यालासुद्धा आहे, एक मित्र म्हणाला.
पण किड्याचा काय उपयोग आहे आयुष्यात? तिसऱ्या मित्राने विचारले.
म्हणजे ज्या जीवाचा उपयोग आहे त्याला भूतदया अन् ज्याचा उपयोग नाही त्याला भूतदया नाही हे तुम्हांला मान्य आहे तर?
मग तिसरा मित्र म्हणाला, हे सयुक्तिक नाही. कारण यात अवास्तव विचार आहे.
त्यावर एक मित्र म्हणाला, हे बरोबर नाही. मी याचा निषेध करतो. जे पटत नाही त्याला तुम्ही अवास्तव विचार म्हणता.
दुसरा मित्र म्हणाला, घोड्याचं काय झालं? तो कसा आहे?
मी म्हटलं, घोडा बरा होतोय् हळूहळू. उपचार चालू आहेत.
बघा, एक मित्र म्हणाला, घोडा बरा होतोच आहे. थोडी कळ काढून याने शर्यत पूर्ण केली असती तर काही बिघडलं नसतं.
यावर दुसरा आणि तिसरा मित्र बरंच बोलले.
माझ्याविषयी, घोड्याविषयी आणि शर्यतीविषयी.
म्हणजे घोडा मधेच पडला असता तर?
किती नुकसान झालं असतं? ह्याला लागलं असतं.
पण घोडा न पडता थोडा पळाला असता तर हा दुसरा किंवा तिसरा तरी नक्कीच आला असता.
म्हणजे तुम्हांला बक्षीसं हवी आहेत, दुसऱ्याच्या जिवाशी खेळून.
असं बरंच बोलणं झालं.
घोडा मुका असल्यामुळे त्याला काहीच बोलता येत नाही याचं मला बरं वाटलं.
ज्याला जखम झाली आहे त्याने मुकं असण्याची आणि इतरांनी खूप बोलायची ही अजून एक वेळ.

मग मी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मित्राला निरोप दिला आणि घोड्याची विचारपूस करायला लागलो.