दमलेल्या अर्पिताला तावातावाने काही तरी बोलायचं होतं पण डोळ्यावर येणार्या पेंगे मुळे ती कधी झोपली, तिचं तिला ही कळलं नव्हतं..
*****
पुढे चालू ..
*****
अर्पिताला जाग आली तेव्हा पहाट व्हायची होती.. जेट लॅग आलाच म्हणायचा की मला सॉलिऽऽड, झोपेचं सायकलच बिघडतं पुर्ण ..ती पुटपुटली.. अंथरूणातच पडून राहूया असे तिने ठरवले. एरवी कुठे मिळतो असा निवांत वेळ.. सकाळ होताना पाहायला ही नशीब लागतं .. नाहीतर आम्ही.. सकाळी साडे सात ला बाहेर पडून बस पकडायला धावत सुटतो..
वरती फिरणार्या पंख्याकडे बघताना पहिला विचार तिच्या डोक्याला भिडला तो राधिकेचा. आज्जीचे विचार खुप जुने आहेत हे तिला पटत होतं आणि त्यात आज्जीची काहीच चूक नव्हती.. वयाची ७० वर्षं ज्या संस्कारात गेली ते संस्कार ते विचार असे अचानक एका रात्रीत बदलणं शक्य नव्हतं.. जात कुठली का असेनाऽ माणूस म्हणून मनाने चांगलं असणं महत्त्वाचं आहे, शिवाय सीए पास नाही झालं तर काय अगदी तो मुलगा वाईट असेल असं नाही काही.. होईल पुढच्या वेळी, मुळात जातीचा वा पैशांचा हा प्रश्न नाही.. प्रश्न आहे तो आपापल्या पायावर उभं राहिल्या खेरीज लग्नाचा विचार का करावा याचा...आई वडिलांवर अजून तो स्वतः अवलंबून असताना हे दोघं लग्नाची घाई का करत आहेत हा तिला कळेना..
तिनं उठून पाहिलं...राधिका गाढ झोपली होती.. छातीशी सुरज चा फोटो बाळगून.. अर्पिताने फोटो उचलला आणि पाहिला.. प्रथमच ती सुरज ला पाहत होती, सरप्राईज म्हणून तिला आत्ता पर्यंत राधिकाने फोटो पण नव्हता पाठवलेला.
आज्जी म्हणत होती त्यात तथ्य होतं. कुठे आपला आकाश आणि कुठे सुरज.. मनाने नकळत तुलना करायला सुरूवात केलीच. आई बाबाना आकाश म्हणजे अगदी शोभेल असाच जावई होता आणि मुख्य म्हणजे तिला. तिच्या सरखाच प्रेमळ, हुशार आणि देखणा होता तो.. पण ती तुलना तिने किड्यासारखी झटकून दिली लगेच..
कारण प्रेम हे असच असतं.. अगदी वेडं.. तिला आठवलं, आकाश ही तिला असाच मनापासून आवडला होता.. डिगरीच्या शेवटच्या वर्षात तिला त्याचं स्थळ आलं होत आणि पहिलच स्थळ मनपसंत पडून लग्न होउन ति ऑर्स्ट्रेलिया ला उडून ही गेली होती भुरकनऽऽऽ.. ती आत्ताच पहिल्यांदा परत आली होती भारतात. दोन वर्षानंतर पोटात बाळ घेऊन..
पहिलच स्थळ आवडल्याने तिच लग्न ही लवकरच झालं.. वयाच्या मानानी.. काकूनं तिची लग्नात छेड काढली होती ते तिला आठवलं, की "काय ग आम्हाला थांगपत्ता नाही लागून दिलास तो.. कॉलेजात होता की काय? "असं विचारून.. आता तर काऽऽय..कपाळाला हातच लावेल ती.. या विचाराने मनोमन हसायला आलं तिला..
काकू...लग्नाला २ तासच आधी आली होती. आईला मदतीला म्हणून सुद्धा आधी नाही आली. बाकी माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या काकवा आठेक दिवस आधी घरी येउन राहिल्या होत्या त्यांच्या लग्नात.. रविदादा तसा नाही पण.. गाडी सजवून आणली होती त्याची त्याने जाऊन ..मला न्यायला. आई बाबांची परिस्थीती तशी बेताचीच होती.. खाऊन पिउन सुखी..
तिला हे सर्व कळत होतं.. म्हणतात ना परिस्थीतीने समज येते.. तिला मावशी नव्हतीच.. एकुलता एक मामा होता त्याचं दुसरं लग्न झालं होतं. पहिली मामी तिला खुऽऽऽप आवडायची आणि त्यांची मुलीशी ही अप्पूची गाढ मैत्री होती ..मामामामींच्या भांडणात तिचा का बळी जावा हे अर्पिताला कळलं नव्हतं. कोर्टात रडणारी लहानगी मामीच्या ताब्यात गेली होती आणि आता एक सावत्र बापा बरोबर नांदत होती .. आणि अश्या विचित्र परिस्थिती मुळे दोघींच्या नात्यावर खुप खोल परिणाम झाला होता.. तिची वेदना अप्पूला कळली ती कॉलेज मध्ये त्यांची एक्मेकींशी गाठ पडली असताना..
आईवडील समंजस नसले की मुलांची किती ससेहोलपट होते हे तिने म्हणूनच अगदी जवळून पहिले होते.. रविदादा ही काकूच्या फटकळ बोलण्याला तसा वैतागलाच होता.. तो ही आईवडिलांजवळ न राहता वेगळा राहत होता पुण्यात. अर्थात नोकरीची सबब होतीच... ती त्याच्या पथ्यावरच पडली होती... त्यामुळे लग्न ही आयुष्यातील सर्वात मोठी घटना आहे आणि ती पुर्ण विचारांतीच घडली पाहिजे यावर तिचा ठाम विश्वास होता. तिने पाहिलं राधिका अजुनही गाढ झोपेतच होती..
****************
राधिका.. सगळ्या सोसायटीतल्या मुलांशी छोट्या बाबीवरून कडाक्याचं भांडण करणारी राधिका.. चक्कं प्रेमात कशी पडली असेल? तिला आश्चर्यच वाटलं. आणि लाडक्या ताईला पत्ता ही लागू न देता? तिला आठवली लहानपणची राधिका.. अभ्यास कर अभ्यास कर अशी आईची भुणभुण चालू असायची आणि अभ्यासाच्या पुस्तकात कुठे गोष्टींचे पुस्तक लपव आणि तेच वाचत बस नाहीतर नेल्पेंटच लावत बस, समोरच्या आरशात पाहत राहून पुस्तक मांडीवर ठेवून बस असं करणारी राधिका.. तिची आवडच काही वेगळी आहे असं कायम तिला वाटत असे. कॉलेजच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत नऊवारी साडी नेसणारी आणि मेक अप ला तासन तास लावणारी राधिका.. नाकात नथ घालून अगदी पेशवीण बाईच वाटत होती, आज्जीने कौतुकाने रमाबाई म्हटल्यावर लाजेने चुर होणारी राधिका.. नशीब की पायानं जमिनीला खड्डा नाही केलान ..तेवढच बाकी होतं.. स्पर्धेत पहिली आली पठ्ठी.. मग अर्पितानेच तिचा नऊवारी मधला फोटो फ्रेम करून तिला वाढदिवसाला भेट दिला होता... पेपर प्रेसेंट/ ग्रूप डिस्कशन्स यापैकी कशात भाग घे म्हटलं की नाही घेणार पण कॉलेज च्या गॅदरींग ची रात्री जागून जागून प्रॅक्टीस करायची, सगळा चमू घेऊन घरी हजर, एकदा तर बारावीच्या वर्षात प्रिलीम परिक्षेच्या आधी एका डान्स कॉंपिटीशन मध्ये भाग घेतला होता आणि त्यासाठी प्रॅक्टीस करत असताना घसरून पडून हाड मोडलं आणि डान्स कॉंपिटीशन राहिली बाजूलाच पण प्रिलीम ही दिली नव्हती तिने..
"अप्पू उठलीस का ग? " आई चहा टाकायला उठली वाटतं म्हणजे पाच वाजले तर..
चहा पिता पिता दोघींच्या गप्पा परत सुरू झाल्या.
"चौथा महिना संपत आलाय ना गं? ऑफिसात किती दिवसांची रजा टाकली आहेस? "
"पंधरा, पुढच्या आठवड्यात आकाश ही येईलच इकडे आणि मग अक्षता पडल्यावर दुसर्या दिवशी आम्ही दोघं लगेच परतणार ग, रजा नाही मला. शिवाय बाळाच्या वेळेला तीन महिने रजा मिळते तिकडे आणि त्यानंतर लागली तर म्हणून रजा ठेवायला हवी ना "
"अप्पू, खूप समंजस आहेस बघ तू पहिल्यापासूनच.. मलाही कमी रजा मिळाली आहे आणि बाबाना सुद्धा. मला आता नोकरी सोडावीशी वाटते पण काय करणार घरखर्च तर भागायला हवा ना? घराचे हप्ते अजून भरतो आहे, आज्जीला आजारपणाचा वगैरे खर्च असतो अधे मध्ये.. तुझे काका काही बघत नाहीत आज्जीकडे त्यामुळे तिला काही करमत नाही तिकडे तिला आपल्याकडेच रहायच असतं.. माझं पेन्शन घ्या आपण भागवू कसं बसं पण मला काकाकडे नका पाठवू असं म्हणत असते"
"आई अगं मी कशासाठी जॉब करतेय तिकडे माझ्या कडे का नाही मागत तुम्ही पैसे? मला का नाही कळवत तुमचे प्रश्न? आकाश ला सुद्धा काही नाही वाटणार त्याचं. अगं तो तुमच्या मुलासारखाच नाही का? "
"अगं ते वेगळं.. होता होईतो आम्ही करणारच. आणि तू करशील गं पण तुझ्या सासरच्याना काय वाटेल? तुला आता त्याना जपायचं पहिले ..मग माहेरचे लोक"
"अगं पण तुम्ही माझे आई बाबा आहात. कोणी लोक नाहीत.. ठीक आहे.. मला काही ही कळवू नका तुम्ही अजिबाऽत"
"चिडू नकोस ग ..बरं आम्ही कळवत जाऊ मग तर ठीक आहे? आपल्या घरातले सगळे लोक कामं करतात अगदी आज्जीला ही पेन्शन आहे शाळेकडून..पण राधिका ...तिला परिस्थीतीची जाण नाही बघ.. तिचं बीकॉम झालं. नोकरी करायची नाही असं म्हणायला लागली म्हणून बाबानी स्थळं शोधायला सुरूवात केली तर अजून शिकायचय म्हणायची कारण नंतर कळलं.. सुरजचं सीए चालू होत म्हणून ही पण शिकत बसली होती एम कॉम ही झालं.. "
"अगं पण तुम्हाला तो पसंत नसेल तर तिला ते सांगितलय का तुम्ही? "
"हरप्रकारे सांगून पाहिलं पण ती ठाम आहे तिच्या निर्णयावर. सुरज मध्ये स्पार्क आहे म्हणे. तुम्हाला दिसत नसेल तर ठीक आहे मी नाही लग्न करणार पण मग मी कुणाशीच नाही करणार हे ही लक्षात ठेवा असं म्हणाली.. शेवटी तिची खुषी आम्हाला महत्त्वाची आहे. आम्ही भेटलो सुरजला. मुलगा दिसायला ठीक आहे पण घरचा चांगला वाटला.. मोठ्ठी शेती आहे कित्येक एकर.. वडील शेती करतात गावाकडे.. एक भाऊ आहे लग्न झालेला.. त्याला तीन मुलं आहेत आणि एक बहिण आहे लग्नाची.. एकत्र कुटूंब आहे त्यांचं.. तीन काका, दोन आत्या अश्या जवळ जवळ वीस पंचवीस लोकांचा राबता अहे घरी. गाई म्हशींचा मोठा गोठा आहे घरी. मोठा वाडा आहे. विहीर आहे दारात.
सीए ला अजून एकदा प्रयत्न करणार आहे नाहीच जमलं तर गावाकडे जायचा प्लॅन आहे आणि मुख्य महणजे त्याला राधिकाची तयारी आहे.. आम्हाला म्हणाली सगळ्यानी त्याच घीस्यापीट्या वाटेवरून जायला हवं असं नाही.. "
"ताईकडे रेकॉर्ड वाजवून झाली वाटतं सगळी लगेच? "-राधिका डोळे चोळत बाहेर आली. "मी ताईसारखं तुम्ही ठरवून दिलेल्या नवर्या बरोबर अमेरिकेला/ऑस्ट्रेलिया ला गेले तरच माझं कौतूक वाटेल का तुम्हाला? हीच अपेक्षा आहे ना तुमची? मी माझी वेगळी वाट शोधली तर तुम्हाला आवडणार नाही का ते? ताई सारख्या अपेक्षा माझ्याकडून करू नका ..प्लीज ..ओके? "
"नाहीऽऽ बाईऽऽ काही नाही. आमची अपेक्षा इतकीच आहे की तू खुष असावस. चहा घेतेस का? " - आईने विषय आटोपता घेतला खरा पण अर्पिताला ते खटकलं.. ""मी ताईसारखं तुम्ही ठरवून दिलेल्या नवर्या बरोबर अमेरिकेला/ऑस्ट्रेलिया ला गेले तरच माझं कौतूक वाटेल का तुम्हाला? "" तिच्या डोक्यात ते शब्द घोळत राहिले.
*********************************
संध्याकाळी दोघी जणी शॉपिंग ला बाहेर पडल्या. लक्ष्मी रोड ला हिंद साडी मध्ये जाऊ या की पहिले पेशवाईत जाऊन सुरज साठी सलवार कुडता घेऊ यावर चर्चा करत हळू हळू खरेदी झाली आणि मग स्वीट होम मध्ये जाऊन बटाटेवडा सांबाराची ऑर्डर त्यानी दिली. सोबत अर्पिताने बिसलेरी मागितली आणि राधिकेच्या कपाळावर उमटलेली सुक्ष्म आठी तिच्या नजरेतून सुटली नाही..
"काय गं सुरज ला नाही वाटतं बोलावलस खरेदी करायला"- तिने संभाषणाला सुरूवात केली.
"नाही त्याला सांगितलय मी की आता पंधरा दिवस फक्त ताई आणि आई बाबांबरोबर.. "- लाडात येऊन राधिका म्हणाली.
"हम्म.. काय ग, किती वर्षांपासून चालू आहे तुमचं गुटरगूऽऽ? ताईपाशी कधीच काही नाही बोललीस तेऽऽ? "
"ताई? ती कधीच गेली आम्हाला सोडून परदेशात.. तिला का वेळ असता माझं चरहाट एकायला? "
"असं का तोडून बोलतेस ? कायमची का गेली आहे मी तिकडे? आणि सकाळपासून एकते आहे मी.. ताईसारखं वागले तरच कौतुक करणार का म्हणजे काय? "
"अगं म्हणजे असं की तु रूळलेल्या वाटेवरून चालतेस म्हणून तुझं कौतुक वाटतं त्याना आणि मी वेगळ्या वाटेने निघाले आहे तर त्याना नकोय ते"
"पण माझी वाट ही एक रूळलेली वाट आहे असं का वाटतं आहे तुला? "
"मग काय तर.. परदेशात तर रहायचं आणि मारे भारतीय कल्चर जपायचं असतं तुम्हा एनाराईजना. एवढसं ढूस काही तरी झालं की लगेच फोटो काढून त्याचा सोहळा करायचा आणि इकडे आईबाबा लगेच मोकळे स्तुतीसुमनं उधळायला. तिकडे जाऊनही माझी लेकरे काऽऽऽही म्हणजे काहीऽऽऽविसरलेली नाहीत बरंऽऽ म्हणायला सुरू करतात ते. छान छान गाड्या घरातून राहता फिरता आणि भारताच्या धूळीला नाकं मुरडता. इकडे येऊन ही परदेशाचेच गूणगान गात राहता, मग इथल्या मुलीना वाटतं की अरे वा चला आपण ही तिकडेच जाऊ. इथलं पाणी ही नको प्यायला तुम्हाला . ̮लगेच बिसलेरीचं पाणी पिता.. का ?? लाज वाटतेऽऽ आपल्या पाण्याची? सुरज चे विचारही असेच आहेत. मला पटतात. त्याची माझी वैचारिक पातळी जुळते. बाह्य रूपाला मला भुलायचं नाही.. "
"अरे वा! चांगले आहेत विचार तुमच्या दोघांचे पण ते एकांगी आहेत, दुसरी बाजू ही कधी तरी जाणून घ्या"
"काय आहे सांग ना दुसरी बाजू? "
बील.. वेटर ने मध्येच बडीशोप आणि बील आणून ठेवले.. त्याच्या समोर आणि हॉटेल मधल्या बाकीच्याची माफक करमणूक नको व्हायला असे वाटून पैसे चुकते करून अर्पिताने राधिकासह तिथून काढता पाय घेतला.. पण राधिकाला दुसरी बाजू ही समजावून सांगायला हवी आहे ..नव्हे त्याची फार गरज आहे हे तिला मनोमन पटलं होतं..
(क्रमशः )