उपलब्ध गाल आहे

प्रेरणास्रोत : भूषण कटककर यांची कविता "श्वासात ताल आहे"

बिनधास्त वाजवावी मजला कुणीही येथे
माझा सदाचसाठी उपलब्ध गाल आहे

भक्ती स्वतः:च करतो, मूर्ती स्वतः:च असतो
वरती स्वतः:स नमतो, माझी कमाल आहे

जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
सध्यातरी दिरांचा मधुचंद्र-काल आहे

मदिरा खराब आहे, आंबूस वास येतो
व्हिस्की न ही, गड्यांनो, देशीच माल आहे

जाते कुठे नि येते, हंसा कुणास ठाउक
भलतीच संशयास्पद हंसाचि चाल आहे

कापू किती किती मी या गीतकार माना
करणार काय सांगा? बकवास माल आहे

रंगित रुमाल पाही नि त्यास खूळ लागे
नजरेत फक्त एका, बकरा हलाल आहे

आजार हा कवींना, जुळवत हजार यमके
वाचू तरी किती मी ? बस हाल हाल आहे

बावीस, हाय, ओळी, चालू असे परीक्षा
केव्हाच लागलेला माझा निकाल आहे

या वाचनात आला ओठांस फेस माझ्या
जडला विकार उदरी, गोटा जमाल आहे

झाले कथून तरिही सोडून जात नाही
ही खोडसाळकीची कसली कमाल आहे !