जेवढी होती मिळाली उत्तरे
तेवढी खोटी निघाली उत्तरे
प्रश्न प्रत्येकास आहे बोचला
माणशी पन्नास आली उत्तरे
शोधण्याची चूक आता भोवली
उत्तरे कसली? सवाली उत्तरे!
प्रश्न तो केला तरी का लाडके?
थांब आता खूप झाली उत्तरे
सोवळ्याचे प्रश्न केले जीवना
का मला देशी मवाली उत्तरे?
माणसे नसतात तितकी वाकडी
वाकड्या करतात चाली उत्तरे
लक्ष थोडे द्यायला होते हवे
खूप होती भोवताली उत्तरे
तूप घालुन प्रश्न आता चालले
लाकडे जळतात, खाली उत्तरे