गेले काही दिवस हे विचार पाठ सोडत नाहीत. काहीतरी खटकते आहे म्हणूनच त्यांची मनातली वस्ती काही हटत नाही. ह्यावर अनेक जणांचे विचार, आवेश, त्रागा व तटस्थता वाचली. पण सल काही कमी झाला नाही.
त्यांतील पहिला विचार, 'सारेगमा लिटिल चॅंम्स ' चा निकाल. कार्तिकी चे मनापासून अभिनंदन! गुणी मुलगी आहे. चांगली गाते. आता एकंदर निकालाचा विचार केला तर मला व्यक्तिशः हा निकाल मनापासून पचनी पडला नाही. शेवटी मेगा फायनल मध्ये गेलेल्या पाचही मुलांच्या गुणवत्तेचा, त्यांनी त्यांच्या वयानुसार आणि कुवतीनुसार केलेल्या अभ्यासाचा निकष लावला तर प्रथमेश व आर्या हेच केव्हाही पुढे असतील. झी ने ह्या सगळ्यातून एक मध्य काढला. तो ही आलेले SMS जाहीर न करता. लोक काय करतील, थोडे दिवस ओरडतील आणि गप्प बसतील. पुन्हा पुढे झी दुसरी स्पर्धा जाहीर करेल तेव्हा नव्या हुरुपाने SMS करतील. हे सरळ गणित मांडून Safe Game खेळला. मुग्धा गोड आहे, तिने छान प्रगती केली हे खरेच पण ती मुळात नंबर एक च्या स्पर्धेत नव्हती.( मुग्धा मला आवडते तरीही ) तिच कथा रोहितचीहि. कार्तिकीचि गुणवत्ता थोडी जास्त. परंतु प्रथमेश व आर्या ह्यांच्यापेक्षा जास्त हे पचवणे कठीण आहे. त्या दोघांतील एकाला विजयी घोषित केले तर दुसऱ्यावर अन्याय होईल की काय ह्या भीतीने झी ने त्यांना चक्क डावलून टाकले. खरे तर चाळीस वर्षांवरील स्पर्धा घेतली त्यावेळी जसे दोन नंबर दिले, एक स्त्रीगटातून अन एक पुरुषगटातून तिच परंपरा आताही पुढे चालू ठेवायची. म्हणजे हा प्रश्नच उदभवला नसता. कोणावरही अन्याय झाला नसता आणि वेगळ्या बाजाच्या कार्तिकीचे जास्त कौतुक झाले असते. अजून एक जातीवाचक प्रवाहही होता, व्यक्तिशः मला त्यात तथ्य दिसत नाही. झीने आलेले SMS जाहीर केले असते तर इतका गदारोळ माजला नसता. पण असे झाले नाही. आणि प्रत्येकाच्या मनात ह्या निकालामुळे अस्वस्थता भरून राहिली.
दुसरा विचार, 'स्लमडॉग ' चा. ऑस्कर मिळाले, आनंद झाला. मला सिनेमा आवडला. चोहोबाजुने अनेक उलट-सुलट मतप्रवाह वाहत होते-आहेत. सिनेमा चांगलाच बनवला आहे ह्यावर बहुतेक सगळेजण सहमत होतील. नेमके ते मार्मिकपणे दाखवले आहे. ह्यातून गरिबी, झोपडपट्टी दाखवायचा उद्देश आहे असे कुठेही जाणवत नाही. स्मिता पाटील च्या 'चक्र' मध्ये ह्याही पेक्षा जास्त चित्रण आहे मग आजच हा आक्षेप का? आपल्या अनेक नामवंत सिनेमांमध्ये याही पेक्षा वाईट गोष्टी- राजकारणी, समाजसुधारकी, पोलीसी दाखवल्या आहेत. त्यांचे काय? का हा सिनेमा एका ब्रिटिश माणसाने काढला म्हणून हा आक्षेप. सिनेमात बोट ठेवण्यासारखा, जाणुनबुजून आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे असा एकतरी प्रसंग दिसतो का?
कादंबरी बदलून टाकली हा एक जोरदार मुद्दा दिसला, परंतु स्वतः लेखकाला ह्याबद्दल कुठलाही आक्षेप दिसत नाही. उलटपक्षी खूपच आनंद दिसून आला. कादंबरी आणि त्यावरून बनवली जाणारी पटकथा ह्या संपूर्णपणे दोन भिन्न गोष्टी आहेत. दोन्हीचे फायदे आणि तोटेही वेगळे आहेत. चित्रपटात वेळेचे बंधन असते आणि त्यात प्रभावीपणे जराही पकड ढिली न पडू देता वाहणारी पटकथा लागते. आणि हेच हा सिनेमा पाहताना जाणवते. अतिशय लहान लहान प्रसंगातून समर्थपणे जराही न रेंगाळता कथा पुढे सरकते. मूळ धागाच जर झोपडपट्टीत आहे तर ती दिसणार हे ओघानेच आले. जातीय दंगल हे जळजळीत सत्य आहे तर त्याची धग तशीच भिडणार. अनेक देवळांच्या बाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी जे घडते ते घडते आहेच. मुले पळवून भिकेला लावणे आणि मुलींना विकणे ह्या रोज घडणाऱ्या घटना आहेत. ह्या घटना अतिरंजित/बटबटीत करून मांडलेल्या कुठेही दिसत नाहीत. अनेक चांगले विचार इतक्या वाईट परिस्थितीतही माणसाचे मन कसे करत असते आणि त्यावर अंमल हि करते हे दिसते. जमाल मलिक लहानपणापासून ज्या खस्ता खात मोठा होत असतो त्यातून तो काय शिकतो आणि योग्य वेळ येताच त्याचा वापर अचूकपणे करतो हे नेमके मांडले आहे.समाजाच्या विविध थरातील, व्यवसायातील, जातीतील, वयाने लहान-मोठी माणसे, विवक्षित परिस्थितीत कशी वागतात, त्यांच्या मनाचे अनेकविध पैलू यशस्विरीत्या बघणाऱ्यापर्यंत पोहोचवले आहेत. आपल्याकडे निसर्ग सौंदर्याची कमी आहे का? नक्कीच नाही मग तरीही बाहेर जाऊन चित्रीकरण का करावे लागते? ह्या मागची मानसिकता प्रेक्षकांना आवडते म्हणून असेल तर मग आपण प्रेक्षक बाहेरच्या सौंदर्याला प्राधान्य देताना आपल्या देशातील निसर्गदत्त सौंदर्य डावलतोच आहोत. त्याचे काय? दाखवले नाही म्हणजे सत्य बदलते का?
ऑस्कर मिळणे म्हणजे सार्थक झाले असे नसून जे गुणवत्तेच्या निकषावर समर्थपणे पात्र ठरले ते अभिनंदनास पात्र आहेतच. रहमान, गुलजार, नावाजलेले आणि कोणालाही माहीत नसलेले किंबहुना आपल्यात हे सुप्त गुण आहेत हे त्यांना स्वतःलाही नुकतेच कळलेले बाल-मोठे कलाकार. ह्या यशामध्ये त्यांचा वाटा मोठा आहे ह्याची जाणीव ठेवून त्यांना ऑस्कर वारी घडवणारे, दिग्दर्शक आणि निर्माते ह्या साऱ्यांचेच कौतुक. जय हो! जय हो! जय हो!