चल पुन्हा आपुल्या देशी !

(परदेशात राहणाऱ्या मुलाचे मन त्याला काय सांगते याचीच ही कविता आहे )

चल पुन्हा आपुल्या देशी, चल पुन्हा आपुल्या देशी,

वाट पाहतो रस्ता जिथला, तशाच जिथल्या वेशी ॥ चल पुन्हा ...॥

वाट पाहते सकाळ तिथली तुझी चहाला,

काम थांबते जरा, सांग रे सांग कशाला?

क्षणोक्षणी तव भास वाहती, येत्या वाऱ्यासरशी ॥ चल पुन्हा .. ॥

हरेक श्वासावरी काढते दृष्ट माउली

मिळते तुजला तिच्या प्रार्थनांचीच सावली,

चाहूल लागता तुझी, धावते ती रे दारापाशी ॥ चल पुन्हा... ॥

तिथे न तू, पण तिथेच तू रे त्यांच्यासाठी

इथेच तू, पण इथे न तू रे तुझ्याहिसाठी

क्षणात कितिदातरी मनाने जिकडे जाशी ॥ चल पुन्हा... ॥

करशिल साऱ्या पूर्ण अपेक्षा, त्यांच्या आशा ,

जाशिलही तू अजून दूरच्या परक्या देशा

पण मातीसुद्धा जिथली, तुजला वैभवराशी ॥ चल पुन्हा...॥