तिखट

किड्यांनी मारल्या गप्पा युगाच्या काळपुरुषाशी
घरी जाऊन सांगी बायकोला  "मारली माशी"

रचावा खंड रक्ताने, बनावी आजची गीता
मिशा हुंगायला सरसावती प्रत्येक पानाशी

कुणी मेले तरी वारूळ होते झुरळ मुंग्यांचे
कुणी जगले तरी संभोग चाहे त्याच प्रेताशी

तुझे पांडित्य कुजलेले अफाटच वाढले की रे
जरा हा कोरडा कचरा झटक तू पौड फाट्याशी

हजारो शेरही येतील रचता काफियावर या
बरे झाले नसे संबंध माझा ठार वेड्याशी

जराशी दखल आहे घेतली तुमची महंतांनो
असा का चेहरा झाला जणू ठोठावली फाशी?

निघाला थेंब, त्याची सिद्धही मर्दानगी झाली
पिटा टाळ्या, अता ते नाव जोडा पौरुषत्वाशी

प्रभा परकी तुझी, आकार चंद्रा त्यामुळे बदले
जगाला मूर्ख करण्याचा गुन्हा येतोच अंगाशी

तळे पाऊस वाफा ऊन हिरवळ पाखरांमध्ये
मला शोधाच आता गाठ आहे मुक्तछंदाशी

कुणी अन्नार्थ जातो, राहतो, परक्या दयेवरती
कुणी पाण्यात जातो फक्त धरण्या वैर माश्याशी