अकस्मात

चाररस्त्यावर फुसांडणारी वाहतूक, भर दुपारचे टळटळते ऊन,

क्लच दाबून-सोडून डावा हात गेलेला कामातून.

जन्मजात मुजोरपणे घुसला समोर तो रिक्षावाला,

आणि जन्मजात आळसटपणे बसलो मी गप्प,

त्या वाहनांच्या गर्दीतून 'मोरी (दुचाकी) नैया पार करो अब' असा धावा करीत.

समोरच्या रिक्षाच्या रेक्झिनच्या छपराच्या मागे,

वीटभर आकाराची प्लास्टिकची खिडकी, तीही फाटलेली.

आणि अचानक त्यामध्ये उमटला तुझा उजवा कान,

तुझ्या बॉयकटमधून नेहमीच उठून दिसणारा,

त्यातल्या हिऱ्यांच्या कुडीच्या मागच्या फुलचापासकट.

आणि तोच तो खाली मानेपासून चार इंच उघडा दिसणारा,

तुझा लालसर गोरा खांदा.

असह्य आनंदाच्या क्षणी अंतर्बाह्य थरथरणारा.

Gabanaचे wide-neck टी-शर्टस घालतेस वाटतं अजून.

का कोण जाणे, अचानक उजवीकडे पाहिलंस तू.

त्या फाटक्या प्लास्टिकच्या खिडकीतून दिसली,

तीच ती चिरपरिचित हनुवटी, तिच्यावरच्या त्या ठळक तिळासकट.

सांगितलं असतं कुणी आपल्याला,

की अतीव आनंद हा नेहमीच क्षणभंगुर असतो,

तर किती खदखदून हसलो असतो आपण,

आठ-दहा तास ही आपल्या विरहाची परमावधी होती तोवर..........

पण आज तीन हात अंतरावरून तुला पाहणे नशिबी आलेय,

आणि तेही किती वर्षांनी.

'त्या' झाडाझडतीनंतर,

बरेच पाणी वाहून गेले नाही पुलाखालून?