जिभेवर राखेचा थर जमल्यागत झालाय,
घसा पडलाय कोरडा, नि डोकं तिरतिरतंय.
काल रात्री जास्त झाली की काय?
गाढ झोप लागली होती, म्हणजे उत्तर 'हो' असणार.
नऊ वाजून गेले असतील?
जाणिवा गोळा करायला घेतल्या.
बाहेर एक खुर्ची जरा जोरात सरकली.
आणि तवा अजून जोरात स्वैपाकघराच्या कट्ट्यावर आपटला.
"योगेशचा फोन येऊन गेला. परत करीन म्हणाला"
कोरडेपणाची परमावधी असा तुझा आवाज.
माझी जीभ परवडली.
आता यावर काहीतरी झणझणीत बोललो,
तर युद्ध सुरू होईल का?
आणि एकदाचा संबंध-विच्छेद होईल का?
नाही.
प्रकट झणझणीत असे मी काही बोलणार नाही,
(मनातल्या मनात कितीही फैर झाडली तरी)
आणि जरी बोललोच,
तरी तू त्याक्षणी मुकाट बसशील.
Willing to wound but afraid to strike.
उभयपक्षी.
मला एक कळत नाही,
बिरबल आणि पोपट ही गोष्ट किमान साडेचारशे वर्षं जुनी.
तरीही आपण २००९ मध्येही
"तो बोलत नाही, हलत नाही, अन्न घेत नाही,
पण 'मेलेला' नाही हं" अशा समजुतीत
किती काळ रेटवणार आहोत?