दुसरा कुणीच नाही

पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही
माणूस माणसाचा झाला कधीच नाही

गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही
टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही

शमले तसेच सारे  देहातले निखारे
वणव्यास  पावसाची नड भासलीच नाही

काळोख तुंबलेला दाही दिशात सारा
सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही

डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही

सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही

जयश्री