प्रश्न

उन्हाळा येऊ घातलेला, संध्याकाळ.

रोजचे तास भरल्यावर आपापल्या घरी निघालेले नोकरदार.

कोण जाणे, कुणी दुसऱ्यांच्याही घरी निघालेले असतील

रस्त्यावर दुचाक्या भरलेल्या, हवेत धूर भरलेला,

आयुष्यात कंटाळा भरलेला.

एका तिठ्यावर, वाहतूक दिवे बंद, पोलिस फरार.

पहिल्यांदा कोण घुसणार, कुणास दक्कल?

सावळागोंधळ.

प्रत्येकजण मनातल्या मनात मोजतोय शिव्या.

कधीकधी त्या शिव्यांचा कोलाहल,

वाहनांच्या हॉर्नच्या भुंकण्यापेक्षाही जोराचा गाजतो.

एक धुराचा काळा ढग (किंवा, काळ्या धुराचा ढग; हवे ते घ्या),

मला गुदमरवून टाकतो.

तरी बरं, मी मुकाट एका कोपऱ्यात उभा आहे.

एक पोलिसांची जीप, खचाखच भरलेली.

ड्रायव्हर आणि दोन ढेरपोटे पुढे,

चार ढेरपोटे मागे.

आणि त्यांच्या पायाशी बसलेला एक हाडकुळा.

"खार्रे दाने...... " कोपऱ्यावरच्या दाणेवाल्याने मारली आरोळी,

आणि त्या हाडकुळ्याने बघितले वर.

त्या संधिप्रकाशात स्वच्छ दिसला,

त्याच्या कानापासून हनुवटीपर्यंत उमटलेला चरचरीत वळ,

आणि नाकपुड्यांमध्ये सुकलेलं रक्त.

तुडवलाय त्याला.

कोण असेल तो?

काय जात?

काय पत्ता?

असं बेरहम तुडवून घेताना काय वाटत असेल त्याला?

नाल ठोकलेल्या बुटांच्या लाथा जेव्हा दोन मांड्यांमध्ये बसतात,

तेव्हा कसा किंचाळत असेल तो?

त्याला कुटुंब असेल का?

त्यांना काय वाटत असेल?

तो जेव्हा वेदनेने कळवळत,

खुरडत घरी परतत असेल,

तेव्हा काय करत असतील ते?

त्याचं लग्न झालेलं असेल का?

त्याच्या बायकोला काय वाटत असेल त्याच्याबद्दल?

की तोही उट्टं काढण्यासाठी तिला तुडवत असेल?