क्षितिजावरचं ते बेट बोलावतंय मला.
भुलवतंय ते दावून स्वप्न त्यावरील गर्द, एकांत छायेचं.
भगभगीत सूर्यप्रकाश परावर्तित करतोय मातकट रंगाचा समुद्र.
रंग असा, की जणू अजगर वितळलेत.
लाटा घुसळताहेत, फेसाळताहेत आणि किनाऱ्याला थोपटताहेत.
त्यांच्या सततच्या फेसाटण्यामुळे वाटतंय,
की माझ्यातलं आणि बेटातलं अंतर वाढतच चाललंय.
एक मच्छीमारी ट्रॉलर चाललाय,
किनाऱ्याला समांतर, धूर ओकत.
हिणवतोय मला तो.
"आहे हिंमत स्वतःचं अस्तित्त्व विरवून टाकायची?
आहे हिंमत त्याच त्या चाकोरीत तुला घुमवत ठेवणारे सांस्कृतिक गुरुत्त्वाकर्षणाचे बंध तोडण्याची?
असेल हिंमत तर सांग.
मग ते बेट अचल आहे नि मी चल".
लाटा मला बेटापासून अजूनच दूर ढकलताहेत.
"शेवटची संधी तुझी" झाडावरून कावळा कोकतोय.
झावळ्यांच्या छपरातून सूर्याचे किरण कवडसे पाडतायत.
ते कवडसे मी मुठीत पकडतो,
आणि माझे स्वत्व जाळून टाकतो.
जाळून टाकतो माझी निळसर स्वप्नं, काळ्या वासना,
हिरव्या प्रतारणा, पिवळे दु:ख आणि लाल वेदना.
सगळं कसं एखाद्या सुखद स्वप्नासारखं भसाभस जळतं.
मग मोकळ्या मनानं त्या वितळलेल्या अजगरांमध्ये उडी घालणं,
आणि धापा टाकत त्या मानवनिर्मित, डिझेल ढोसणाऱ्या यंत्रावर बैठक जमवणं,
सगळं कसं सुशेगात होतं.
समुद्र आहे अतिसहवासाने विझलेल्या प्रेमासारखा शांत.
पण हे काय?
चाललोय तर मी पुढं,
पण त्या बेटावरून संदेश येताहेत ते मात्र सगळे एकजात
निळसर, काळे, हिरवे, पिवळे नि लाल.
सहावा रंग म्हणून नाही.
घोर फसवणूक.
करू तरी काय मी?
अडकलेला असा,
ना बेटावर, ना किनाऱ्यावर.
जिवंतपणाचे लक्षण,
ना समुद्रात, ना माझ्यात.