गनिमी कावा- पुढे
ते शाळेच्या इमारतीच्या गच्चीवर उतरले तर काय होईल या विचाराने
अवंतीच्या मनात घालमेल सुरू होती, तिने न सांगताही मला ते कळले होते.
रामच आपल नेहमी भलतच असत. फार फिल्मी विचार मांडतो. कधी फार हताश करणारे आणि विनाशाचे चित्र उभे करतो तो.
"चकाचक काचांनी बनलेल्या इमारतीवर आदळून
काचांचा चुराडा करेल ते" असे काही तो बरळला.. ऐकून मी सर्दच झालो.
देशाचे भविष्य ज्यांच्या हातात आहे अशा सर्व तंत्रज्ञानाची काम करणाऱ्याचा
नाश होणार? इतरांचे काय? नक्की कोणाचा डाव आहे का? काय असेल यामागे
कारस्थान?
विमान आत येऊन ट्विन टॉवर्स पडले तसेच होईल का? की आता हे
गाड्यांवर आदळेल? काय घडेल नक्की? अशा एक ना अनेक विचारांनी मनाचा नुसता
छळवाद मांडला होता.
हल्ला नक्की कोणत्या देशाने करायचा कट केला आहे की
अवकाशातून, दुसऱ्या ग्रहावरून त्याची तयारी आहे याचा शोध सर्व संस्था घेत
होत्या. अमेरिकेत, युरोपमध्ये हळू हळू धुळीचे प्रमाण वाढायला लागल्याच्या
बातम्या कानावर येत होत्या. एका विशिष्ट रंगाने खेळणी, इमारती, ऑफिसेस,
रस्ते सर्व काही रंगीत झाले होते. अजून तरी अमेरिकेतून पेंटेगॉनने कोणताही
धोक्याचा इशारा दिला नव्हता. म्हणजे कदाचित काही नसेलही तसे..
अवंती म्हणली, "प्रदूषण व धूळ यात काय विशेष? रोजच श्वास घेतो ना आपण यातच
., अगदी बदल हवा असेल तर आता फक्त काळ्याऐवजी कदाचित वेगळा रंग येईल. "
"म्हणजे धूळवड का ग आई, रोजच? सुटी मिळेल ना शाळेला? " लहानग्या मंदारचा प्रश्न अगदीच निरागस..
मी हसलो. "आमच्यावर येऊन येऊन आणखी काय कोसळणार आणि त्याने काय होणार?
मन्या तू तर एकदम शूर आहे हो ना रे? "
मंदारने हो....... म्हणत मला थम्स अप केले होते.
पण रामला वाटत होते की आमच्या होणारा हल्ला नक्की जबरदस्त असणार. अगदी परग्रहावरून वगैरे.
पण हल्ल्यानंतर आमचे काय होणार हे त्या देवालाच माहीत असे म्हणत रामचा मारूतीचा जप खूप वाढला होता तर दुसरीकडे त्याने
कंपनीतल्या, ओळखीच्या लोकांना कसलेसे घड्याळ विकायचा सपाटा लावला होता.
त्यातल्या यंत्रामुळे काही विशिष्ट संदेश आधीच कळतील असा दावा त्याने केला होता. यंत्राचा खप असा झाला की कुठलाही मध्यस्थ न घेता, कमीशन न देता, गल्ला भरण्याचे काम अखेर
त्याला साधले.
म्हटल्याप्रमाणे दोन दिवसात सगळे घर रिकामे करण्यात आणि त्याचा खिसा भरण्यात
राम यशस्वी झाला .स्वतःच्या कामगिरीवर खूष होत सावकाश राम बिअरच्या
बाटलीतून घोट घोट पीत होता.
मारूतीचे नाव घेत बियरचे घोट घेणारा राम. त्याचे स्वप्न पूर्ण झाले
होते.
"तुझ्यापुढे, तसेच देवळातली गर्दी, कोणत्यातरी बुवा आणि महाराजांपुढील रांग वाढण्याकरता बरे कारण मिळाले " मी उपहासाने म्हणालो.
पण ते अवसान, तो उपहास तसाही क्षणिक होता. मी उसासलो, पुन्हा विचारात
गढलो. दिव्याभोवतीची काजळी वाढत जावी तसे मरणाचे भय वाढत होते. एकदम अंधार
व्हावा तसेच मरण येवो. उगीच असे मरणाची वाट पाहणे नको. पण एक मन म्हणत
होते मला जगायचे आहे. अवंतीचा विचार मनात आला.
तिला लग्नाचे विचारलेच
पाहिजे. काय म्हणेल ती? आता अशा वेळी होईल तयार? मग तिचा होकार, आमच्या भेटी, तिची
जवळीक.. माझ्या मनाच्या तारा झंकारत रहिल्या. ऑफिसात आणि घरात नाहीतरी
असेच वादळी विचार आणि विचारांचे वादळ मला छळायचे..
असाच दुपारचा एक वाजायला आला असतांना आकाशात अचानक काही तरी दिसले.
त्यावेळी आमच्यापैकी बरेच जण जेवत होते. काहीजण रस्त्यावर होते.मी ऑफिसाच्या गच्चीवर सिगरेट घेऊन उभा होतो. ते फूटपाथवर आणि रस्त्यावर स्तब्ध
उभे राहिले होते. नकळत मी गर्दीत सामील झालो. मी बघितले तर त्यां सर्वांच्या चेहर्यावर आश्चर्य
दिसत होते. एकाएकी शिट्ट्या, टाळ्यांचा आवाज सुरु झाला. मोठ्यांदा
आरडाओरडा आणि हवेत हातवारे सुरु झाले. कुठेतरी बोट दाखवून लोक अंदाज
व्यक्त करत होते. निळ्याशार आकाशात नक्की काहीतरी चमकत, चकाकत होते.
एरवी
एकमेकीच्या चहाड्या करणाऱ्या आणि नखे रंगवण्याचे काम करण्यात दंग
राहणाऱ्या माझ्या ऑफिसातल्या सेक्रेटरी उठून सगळ्या खिडकीकडे धावल्या.
त्यांना त्यांच्या केसाच्या बटांचे, अर्धवट रंगवलेल्या नखाचे सुद्धा भान
नव्हते. पलिकडल्या गाळ्यात असणारे दुकानदार पैसे मोजता मोजता गल्ल्यावर
थबकले होते. पैसे तसेच सोडून काही एकदम दुकानाबाहेर धावले. एखाद्या
हाडाच्या तुकड्याकडे जीभ बाहेर काढून एकटक कुत्र्याने बघत राहावे एवढे तल्लीन होऊन लोक आकाशाकडे बघत होते. हा आपल्याकरता रचलेला सापळा असेल याचे सुद्धा त्यांना भान नव्हते.
अंदाजे तीन की चार मिनिटेच तो झगमगाट कायम होता. त्यानंतर त्याची चकाकी
आणखीनच वाढली. तो प्रकाशाचा बिंदू वाढू लागला. एवढा प्रकाश होता की तो
प्रकाश उत्तरे कडून की पूर्वेकडून आला होता ते सुद्धा समजेनासे झाले होते. एकाएकी सर्व
आकाशच सोनेरी रंगाने माखले आहे असे वाटू लागले. आणि सोनेरी रंगाचे कण
अंगावर यावे असे ते सोनेरी कण आमच्या दिशेने धु़ळीसारखे उडत येऊ लागले.
आमच्या घराच्या छपरांवर, रस्त्यांवर, पाऊलवाट असते तिथे सगळीकडे ते दिसू
लागले. हळूहळू सोनेरी रंगाचा पिवळसर पांढरट पिवळा रंग झाला. आमच्या
सायकली, दुचाक्या, गाड्या सर्वकाही पिवळ्सर रंगाने माखले होते. त्याचे काय
करायचे तेच आम्हाला कळेनासे झाले होते. जवळजवळ पंधरा मिनिटे हीच स्थिती
होती. आम्हाला आकाश दिसेनासे झाले जोते. त्यांतर हे सर्व थांबले आणि
नेहमीप्रमाणे सूर्याचे दर्शन झाले, आकाशही दिसले. आकाशात ढग
जमावे, मुसळधार पावसाच्या सरी येऊन गेल्या की मग आकाश पुन्हा स्वच्छ
व्हावे आणि सूर्यकिरणांनी पृथ्वीप्रकाशमान व्हावी तशी साधी घडना घडून गेली
होती. पण..
पण आमचा पुनर्जन्मच झाला होता..........
हे सर्व घडत असतांना आम्हाला आत राहण्याची सूचना वारंवार दिली जात
होती. त्या पिवळ्या कणांना हात लावू नका, सावध रहा असे सुद्धा सांगितलेले
होते. पण जे घडले ते इतक्या कमी कालावधीत घडले होते, ते कण एवढे
मंत्रमुग्ध करणारे भासत होते की या सर्व सूचना आमच्यापर्यंत आल्या तरी
मेंदूने त्यावर काही हालचाल केली नव्हती. सर्व माहिती असूनही आम्ही
त्याप्रमाणे खबरदारी घेतली नाही. त्या रंगाने पुरते माखले होतो. काय होईल
पुढे? उत्कंठेने आणि मनाचा ताबा भीतीने घेतल्याने शब्द सुचेना.
तेवढ्यात त्या कणांमध्ये घातक असे काही आढळले नसल्याची घोषणा झाली.
अवंती म्हणाली, 'उंदीर, माकड या प्राण्यांना ते कण खायला दिले होते.
प्राथमिक चाचण्यात तरी त्यात घातक असे काही आढळले नव्हते ही आनंदाची गोष्ट
होती. त्या कणांवर विविध चाचण्या करण्यात आल्या आहेत. "
"अवंती, काय खोटे, काय खरे कसे समजायचे? सगळ्याच चाचण्यांवर मी विश्वास ठेवत नाही. "
पण जीवाला धोका नाही असे सांगण्याऱ्या चाचणीवर विश्वास ठेवावा असे वाटत होते.. आमचा जीव भांड्यात पडला.
मी अवंतीला कधी घट्ट जवळ धरले होते ते समजले नव्हते. मनावरचा ताण हळूहळू
कमी होईल अशाच बातम्या कानावर येत होत्या. सुदैवच म्हणायचे.
त्या कणांपासून दूर रहा असेच घोषणेत बजावले होते. ते कण घातक नसले तरी त्या कणांचे नेमके स्वरूप अज्ञात होते.
आमच्या इलेक्ट्रिसिटीच्या तारा, टेलिफोनच्या तारा, रस्त्यावरचे खांबे,
रस्ते, गाड्या, झाडे घरे सर्व काही त्याने पिवळट झाले होते. आम्ही मान
उंचावून आकाशाकडे पाहिले. आता अजून काय खाली येणार आहे याचा मनात विचार
सुरू होता. पण काही विशेष घडलेच नाही. रात्री कधी तरी डोळा लागला असावा.
दुसर्या दिवशी सकाळी पिवळ्या मखमली जगात आम्ही जागे झालो. ही मखमल
घरांवर, इमारतींवर, कुंपणावर, टेलिफोनच्या तारांवर जिथे म्हणून नजर जाईल
तिथे होती, वाढत होती. रस्ता पिवळा, घरे पिवळी, पाने फुले झाडे पिवळसर...
पाखरांनी पंखांची फडफड केली की पिवळसर पावडर उडायची. बहव्याला असा काही
मोठा बहर यावा आणि पिवळ्या फुलांची उधळण सगळीकडे व्हावी असे झाले होते. लहान मुलांच्या उत्साहाला उधाण आले होते.
तेवढ्यात रस्ते झाडणारे कर्मचारी आले, पाण्याच्या फवार्याने त्यानी
रस्ते धुवून काढले. आदेशानुसार लोकांनी अंगणे साफ केली. खालच्या जमिनीचा
व रस्त्याचा रंग पुन्हा ताजातवाना झाला. जरा हुश्श झाले. जरा
दिवसाच्या कामाला लागतो तो पण काही तासातच पुन्हा पिवळ्या रंगाची वाढ झाली
असे दिसले आणि रस्तोरस्ती दारोदारी पिवळ्या कणसाने लगडलेली शेते दिसावी
तसे दृष्य दिसू लागले आणि टेलिफोनच्या तारांवर पिवळ्या रंगाचे
ठिपके धावू लागले.
आता आश्चर्याचा धक्का आम्हाला बसला होता... दिसते तेवढे काही एवढे प्रकरण साधे नव्हते तर....
क्रमशः