बरी नात्याहुनी मदिरा ...... भिने रक्तात खात्रीने

बघ्यांचे चालुदे नेपथ्य, पण नाटक तरी आहे
सुखाच्या भूमिका अन दुःख संपादक तरी आहे

तुला माझे कधी काहीच होणे साधले नाही
तुझ्यासाठी कधीचा मी अनावश्यक तरी आहे

'टिकावे मी कसे' हा प्रश्न नाही फारसा टिकला
बरे झाले म्हणा, ही जिंदगी मारक तरी आहे

तुझे होणे 'न होण्यासारखे' आहे असे कळते
चला आहे तरी सध्या, इथे नाहक तरी आहे

बरी नात्याहुनी मदिरा, भिने रक्तात खात्रीने
घसा आधीच पोळावा अशी दाहक तरी आहे

मला माझा नसावा तेवढा विश्वास लोकांचा
कुणाचाही असो विश्वास, बेलाशक तरी आहे