छळतो अजूनही का

पाऊस कालचा तो, छळतो अजूनही का
जाळून काळजाला, झरतो अजूनही का

ही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले
मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का

तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले
देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का

होती अशीच ओली, ती रात्र वेदनांची
उघडून त्याच  जखमा, जगतो अजूनही का

पाऊस मित्र माझा, मैत्रीस जागणारा
विरहात मात्र ऐसा, छळतो अजूनही का

आभाळ मुक्त झाले, वचनातुनी सरींच्या
मी ऋण पावसाचे, जपतो अजूनही का

जयश्री अंबासकर