पाहिले वागून मी... राजाप्रमाणे!

कोण आहे चालले कोणाप्रमाणे?
माणसे सारी तुझ्या-माझ्याप्रमाणे!

पाहतो मी वाट, तू येतेस कोठे?
प्रेम आहे आपले विरहाप्रमाणे!

एकही माणूस नाही पाहिला मी
आवडावे ज्यास मी माझ्याप्रमाणे

मी स्वतःला जाणताना जाणले की
गूढ झालो आणखी विश्वाप्रमाणे

मंदिराचा थाट दे सोडून देवा
दाव तू वागून या भक्ताप्रमाणे

तेच होते शेवटी साऱ्या जगाचे
पाहिले वागून मी राजाप्रमाणे

वेगळे केलेस नक्की काय भूषण?
वागला होतास तू देहाप्रमाणे!