कळले जमीन नांगरायला पुन्हा हवी
हृदयांत वेदना उगायला पुन्हा हवी
येते सुखात थंड भावना, अता कळे...
दुःखे अजून पांघरायला पुन्हा हवी
बोटे धरून चालती लहानगी मुले
पण प्रेयसी तशी सुटायला पुन्हा हवी
शस्त्रें मनास छेदुनी अभंग गायली
ओवी तशीच आळवायला पुन्हा हवी
जपली जुन्या-नवीन खेळण्यात भावना
ती माणसात आज यायला पुन्हा हवी
जाळून काळजास काय साधलेस तू ?
काव्यासवे चिता रचायला पुन्हा हवी